Bhor Lockdown: भोरमध्ये पाच दिवसाचा कडक लॉकडाऊन! कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 03:26 PM2021-05-07T15:26:23+5:302021-05-07T15:37:28+5:30
७ ते १२ मे या कालावधीत भोर शहरात कडकडीत बंद
भोर: भोर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या यामुळे प्रशासनाने भोर शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. आज पासून १२ मे राञी १२ वाजेपर्यंत भोर शहर लाँकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे शहरातील सर्व व्यवहार बंद असणार आहेत.
भोर शहरात व तालुक्यात वाढत असलेली कोरोनाची संख्या पाहता यावर उपाययोजना करण्यासाठी कडकडीत बंद पाळण्यात येणार आहेत. शहरातील आरोग्यसेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.
भोर तालुक्यातील नगरपालिका क्षेत्रात व ग्रामीण भागातील ज्या गावांमध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. तसेच त्या ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे. तेथील प्रसार रोखण्याच्या उद्देशाने भोर नगरपालिका क्षेत्रामध्ये ७ मे शुक्रवार पहाटे १ वाजल्यापासून १२ मे बुधवार रात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. सदर काळात फक्त रुग्णालय सुविधा, औषधे दुकाने सुरू असतील. सकाळी ७ ते ९ या कालावधीत दूध वितरण सेवा चालू राहील. भाजीपाला फळे किराणासह सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार आहेत. दरम्यान पाच दिवसाचे लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सदर कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय यंत्रणा पोलिस यंत्रणा निर्देश दिले आहेत.