गजा मारणेच्या सहा साथीदारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:14 AM2021-03-09T04:14:54+5:302021-03-09T04:14:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आरोपींनी आणखी कुठे दहशत निर्माण केली आहे का?, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्यांना अटक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आरोपींनी आणखी कुठे दहशत निर्माण केली आहे का?, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्यांना अटक होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा सरकारी वकिलांचा युक्तीवाद मान्य करीत, न्यायालयाने गुंड गजा मारणे याच्या सहा साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पिंगळे यांनी हा आदेश दिला. रूपेश कृष्णा मारणे, सुनिल नामदेव बनसोडे, संतोष सुधाकर शाळीमकर, महेश काशिनाथ गुरव, सचिन आप्पा ताकवले, श्रीकांत संभाजी पवार अशी जामीन फेटाळण्यात आलेल्यांची नावे आहेत. १५ फेब्रुवारी रोजी तळोजा मध्यवर्ती कारागृहातून गुंड गजा मारणे याची सुटका झाली. त्यावेळी मारणे त्याच्या साथीदारांनी सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बेकायदा गर्दी जमवून फटाके वाजवून आरडा-ओरडा करत त्याचे चित्रीकरण केले. तसेच मास्क न लावता कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सहा जणांनी अर्ज केला. यास अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे-पाटील यांनी विरोध केला. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत सहा जणांचा अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी गजानन मारणे याने २५ फेब्रुवारी रोजी वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समोर हजर होऊन जामीन घेतला आहे.