भोर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ६ शेळ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 04:42 PM2018-10-06T16:42:12+5:302018-10-06T16:44:00+5:30
भोर तालुक्यातील वेळू गावातील एका शेतकऱ्याच्या शेळ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्या मृत झाल्या आहेत.
भोर: भोर तालुक्यातील वेळू गावातील एका शेतकऱ्याच्या शेळ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्या मृत झाल्या आहेत. शुक्रवारी (दि. ५) रात्री २ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. बिबट्याचा हल्ल्याने शेळ्या मृत झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील वेळू व गोगलवाडी शिवेनजीक असलेल्या शेतातील वेळू गावातील माणिक काळूराम वाडकर या शेतकऱ्याच्या त्या शेळ्या होत्या. वाडकर यांच्या शेतात बंदिस्त गोठयातील शेळ्यांवर भक्ष्याच्या शोधत असलेल्या बिबट्याने हल्ला केला. बिबट्याचा या हल्ल्यात कळपातील सहा शेळ्या मृत झाल्या. शेतकरी वाडकर शनिवारी सकाळी शेतात गेल्यावर हा प्रकार त्यांच्यासमोर आला.
तालुक्यातील वेळू गोगलवाडी ससेवाडी कासुर्डी गावडदारे या परिसरात बिबट्या वावर असून, शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. मात्र, याबाबत वन विभागाने गांभीर्याने घेतलेले नाही. पिंजरा लावण्याबाबत अनेकवेळा मागणी करून देखील कारवाई झालेली नाही. बिबट्याचा हल्ल्यात शुक्रवारी सहा शेळ्या मृत झाल्यानंतर तरी वन विभाग जागे होईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
नसरापूर परिक्षेत्राचे वनाधिकारी लांडगे यांच्याशी बोलणं झालं असता त्या परिसरात पाहणी करून वरिष्ठांशी बोलून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येईल असे सांगण्यात आले.