सिंहगड रस्त्यावरील चालकाचा सहा लाखांवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 08:39 PM2018-09-15T20:39:10+5:302018-09-15T20:43:45+5:30
सिंहगडरोडवरील नांदेडसिटी येथे एका सतरा वर्षांच्या तरूणाने सातारा येथील नातेवाईकाला देण्यासाठी दिलेली सहा लाखांची रक्कम घेऊन कार चालक भामटा पसार झाला.
पुणे : सिंहगडरोडवरील नांदेडसिटी येथे एका सतरा वर्षांच्या तरूणाने सातारा येथील नातेवाईकाला देण्यासाठी दिलेली सहा लाखांची रक्कम घेऊन कार चालक भामटा पसार झाला. पसार झालेल्या या भामट्याकडून हवेली पोलिसांनी तत्परतेने अवघ्या दहा तासांत सर्व रक्कम ताब्यात घेत अजय गोडसे (रा.नांदेडसिटी) यांना परत दिली. त्यावेळी गोडसे पती पत्नी आणि मुलाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले.
माधव तुकाराम मोरे ( वय ,३१ ,मुळ रा. लातूर, सध्या रा. बिबवेवाडी ,पुणे ) असे भामट्याचे नाव आहे. तो खाजगी कार चालक असून प्रवासी वाहतूक करण्यासाठी नांदेडसिटी येथे आला होता. त्यावेळी नांदेडसिटी येथील मंगलभैरव बिल्डींग मध्ये राहणाऱ्या चैतन्य अजय गोडसे (वय १७) यास त्याच्या आईने वडूज (सातारा) येथील नातेवाईकास देण्यासाठी सहा लाख रुपयांची रक्कम घेऊन बिल्डींगच्या गेटवर आलेल्या एका कार चालकाजवळ देण्यासाठी पाठविले. त्यावेळी गेटवर भामटा माधव मोरे कार घेऊन उभा होता. चैतन्याने मोरे याला हात दाखवून इशारा केला. त्यावेळी मोरे यानेही त्याला हात दाखवून इशारा केला. त्यामुळे चैतन्य यास वाटले हात दाखवत असलेल्या कार चालकाजवळ रक्कम देण्यास सांगितले आहे. असे समजून चैतन्य याने सहा लाख रुपये भामटा माधव मोरे याला दिली.नंतर चैतन्य याने मोरे याला मोबाईलवर वडिलांना फोन लावून दिला. त्यावेळी मोरे याचा आवाज ऐकून वडिलांना संशय आला. त्यांनी चैतन्य यासकडे मोबाईल देण्यास सांगितले.मात्र मोरे याने फोन बंद केला. मोरे सर्व रक्कम घेऊन कारसह लगबगीने पसार झाला.
त्यानंतर खरा कार चालक गेटवर आला. त्यावेळी भामट्याने सहा लाख रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केल्याचे गोडसे यांना समजले.
हा प्रकार दुपारी दीड वाजता घडला. याची तक्रार गोडसे यांनी हवेली पोलीस ठाण्यात रात्री आठ वाजता दाखल केली. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी मोठ्या रक्कमेच्या चोरीचे गांभीर्य पाहून तातडीने तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक आर.के. वाईकर, हवालदार शेंडगे, वानोळे यांच्या पथकासह मंगलभैरव बिल्डींग तसेच नांदेडसिटीतील रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून भामटा माधव मोरे याला दुसरया दिवशी सकाळी अवघ्या दहा तासांत ताब्यात घेतले. तो रक्कम घेऊन पोबारा करण्याआधीच हवेली पोलीसांनी त्याच्याकडून सर्व सहा लाख रुपयांची रक्कम वसूल केली.आणि ती गोडसे यांना परत दिली.