कात्रज-कोंढवा रस्त्यावर होणार सहा पदरी उड्डाणपूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 02:05 AM2019-02-28T02:05:27+5:302019-02-28T02:05:30+5:30
आमदार योगेश टिळेकर : नवले चौक ते कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक होणार सुरळीत
- अभिजित डुंगरवाल
कात्रज : वाहतूककोंडीमुळे कुप्रसिद्ध झालेल्या व मृत्यूचा सापळा म्हणून ओळख निर्माण झालेला वडगाव येथील पुलापासून ते कात्रज-
कोंढवा रस्त्यावरील खडीमशीन चौकापर्यंतचा रस्ता आता मोकळा श्वास घेणार आहे, अशी माहिती ‘लोकमत’शी बोलताना आमदार योगेश टिळेकर यांनी दिली.
याविषयी माहिती देताना आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले की, अनेकांचे प्राण या रस्त्याने आतापर्यंत घेतले आहेत. भागातील लाखो नागरिक या रत्यावरील अतिक्रमणांमुळे व दररोजच्या वाहतूककोंडीमुळे हैराण झालेले आहेत. मी आमदार झाल्यावर, सर्वप्रथम ८ सप्टेंबर २०१५ रोजी कात्रज ते थेऊर फाटा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर करण्यासाठी लेखी पत्र दिले होते. लक्षवेधी उपस्थित केली. शासन दरबारी सर्व अधिकारी यांच्याशी सतत संपर्कात राहिलो. आंदोलनेदेखील केली. त्यामुळे फेब्रुवारी २०१८ मध्ये हा रस्ता शासनाने राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी. डी. म्हणून घोषित केला आहे.
सदर उड्डाणपूल हा पुणे महानगरपालिका व कात्रज प्राणिसंग्रहालय हद्दीतून जात असल्याने पुणे महानगरपालिकेची नाहरकत मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेने व प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांनी तातडीने नाहरकत देणे अपेक्षित आहे.
त्यापैकी नवले पूल ते कात्रज सहा पदरी कामासाठी २०१८-१९ मध्ये ९६.७७ कोटी कामाची निविदा प्रगतिपथावर असून कात्रज येथील सहा पदरी पुलाच्या कामासाठी १२६.६९ कोटी रुपयांच्या कामांची निविदा शासन दरबारी सादर झाली आहे.
कात्रज-कोंढवा रस्ता जेवढा वाहतूककोंडीसाठी प्रसिद्ध आहे, तेवढाच येथील श्रेयवादाच्या लढ्यासाठी देखील कुप्रसिद्ध आहे. हे काम तातडीने होणे आवश्यक आहे. कारण, अनेकांचे संसार या रस्त्याने उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे येथील सर्व नेत्यांनीदेखील या कामासाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. मात्र, आता एकजूट होऊन श्रेयवाद थोडासा बाजूला ठेवून हा उड्डाणपूल व रस्ता होण्यासाठी सहकार्य करावे, अशी भावना येथील स्थानिक नागरिकांची आहे.