पुणे शहर भाजपाने मागितल्या मुख्यमंत्र्यांच्या सहा सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 12:46 PM2019-03-23T12:46:32+5:302019-03-23T12:47:38+5:30
मोदी, शहा, मुख्यमंत्री यांच्या सभांसाठी मोठे मैदान लागणार आहे. त्यानुसार काही संस्थांबरोबर बोलणी सुरू आहेत
पुणे: उमेदवार जाहीर केला गेला नसला तर भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहर शाखेने प्रचाराचे नियोजन मात्र जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहा सभांची मागणी राज्य शाखेकडे करण्यात आली असून केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांच्याही सभा मिळाव्यात असे कळवण्यात आले आहे. त्याशिवाय चौक सभा, कोपरा सभा, रोड शो यांचेही नियोजन सुरू आहे.शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ही माहिती दिली. पक्षाच्या केंद्रीय व राज्य शाखेने प्रचाराचे नियोजन करण्याबाबत कळवले असून त्यानुसार बैठका घेऊन तसेच विविध समित्यांची स्थापना करून काम सुरू आहे असे ते म्हणाले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा व्हाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्याही सभा मागण्यात आल्या आहेत. सभांसाठी जागा शिल्लक नसल्यामुळे त्याचेही नियोजन सुरू आहे. मोदी, शहा, मुख्यमंत्री यांच्या सभांसाठी मोठे मैदान लागणार आहे. त्यानुसार काही संस्थांबरोबर बोलणी सुरू आहेत अशी माहिती गोगावले यांनी दिली.
भाजपाच्या शैलीप्रमाणे चौक सभा, कोपरा सभा यावर भर देण्यात येईल. त्याचेही नियोजन बूथ केंद्र प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख तसेच नगरसेवकांच्या सहकायार्ने सुरू आहे. त्यासाठी स्थानिक तसेच राज्यस्तरावरील काही वक्ते असतील. अशा २२ वक्त्यांची यादीच तयार करण्यात आली आहे. त्यांना त्याबाबत कळवण्यात आले असून त्यांच्या तारखांच्या नियोजनानुसार सभांचे आयोजन केले जाईल. रोड शो साठी पक्षाचे स्टार प्रचारक आणले जाणार आहेत. त्याचेही नियोजन सुरू आहे असे गोगावले म्हणाले.
.............
जागा भाजपाकडे असली तरी युती करून ती आम्ही लढत आहोत, त्यामुळे आमच्या प्रत्येक नियोजनात शिवसेना व आमचे मित्रपक्ष आहेतच. संयुक्त मेळावा रद्द झाला, आता प्रचाराची गडबड असल्यामुळे तो होईल असे वाटत नाही, मात्र २४ मार्चला कोल्हापूरला प्रचाराचा एकत्रित नारळ वाढवण्यात येणार आहे. तशीच प्रचाराची एक संयुक्त सभा पुण्यातही व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे गोगावले यांनी सांगितले.