सहा महिन्याची कामे केली एकाच दिवसात!
By admin | Published: December 11, 2015 12:46 AM2015-12-11T00:46:59+5:302015-12-11T00:46:59+5:30
महावितरणच्या त्रिसूत्री कार्यक्रमांतर्गत पिंपरी उपकेंद्र शाखेच्या अंतर्गत वेगवेगळी दुरुस्ती कामे, नवीन मीटरजोड आणि तांत्रिक बदल आदी कामे युद्धपातळीवर एका दिवसात पूर्ण करण्यात आली.
पिंपरी : महावितरणच्या त्रिसूत्री कार्यक्रमांतर्गत पिंपरी उपकेंद्र शाखेच्या अंतर्गत वेगवेगळी दुरुस्ती कामे, नवीन मीटरजोड आणि तांत्रिक बदल आदी कामे युद्धपातळीवर एका दिवसात पूर्ण करण्यात आली.
सुमारे सहा महिने मुदतीतील ही कामे विक्रमी वेळेत केवळ एकाच दिवसात करण्यात आली. यासाठी २२ अभियंत्यांसह ३०० कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या मोहिमेमुळे या भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण घटणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे.
महावितरणतर्फे त्रिसूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पिंपरी विभागातील पिंपरीगाव उपकेंद्रात गुरुवारी ही मोहीम राबविण्यात आली. पिंपरीगाव, वाघेरेवस्ती, पिंपरी कॅम्प, शास्त्रीनगर, भाटनगर, बौद्धनगर, चापेकर चौक, लिंक रोड, फिनोलेक्स चौक, जिजामाता हॉस्पिटल, जयहिंद स्कूल, नाणेकर कॉम्प्लेक्स, मंडई या भागांत मोहीम राबविण्यात आली.
मोठी बाजारपेठ आणि झोपडपट्ट्या असलेला हा भाग आहे. येथे एकूण २५ हजार ग्राहक आहेत. बौद्धनगर येथे ४८ नवे मीटर देण्यात आले. बिलासंदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यात आले. त्याचा लाभ ६ ग्राहकांना झाला. नादुरुस्त आणि जुने १२० मीटर बदलून देण्यात आले.
जुने फीडर बदलून नवे बसविण्यात आले. रोहित्रच्या परिसरातील गवत आणि कचरा काढून साफसफाई केली गेली. फीडर पिलरचे निघालेले दरवाजे बसविण्यात आले. रोहित्रामध्ये आॅईल टाकण्यात आले. जुने आणि खराब केबल व तारा बदलून नव्याने टाकण्यात आल्या. तसेच, गंजलेले व खराब खांब बदलण्यात आले. अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या. २२ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीवर नवे स्विच बसविण्यात आले. जॅम्पचे बॉयडिंग केले गेले. एकमेकांना स्पर्श करू नये म्हणून तारांवर २२ ठिकाणी पेसर लावण्यात आले. (प्रतिनिधी)
महावितरणच्या त्रिसूत्री कार्यक्रमांतर्गत ही मोहीम गुरुवारी राबविण्यात आली. गुरुवारी वीज खंडित असल्याने दिवसभर दुरुस्ती आणि जोडणी कामे करण्यात आली. येत्या सहा महिन्यांत होणारी ही सर्व कामे केवळ एका दिवसात वेगात केली गेली. पिंपरी विभागातील २२ उपकेंद्रांत टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबविली जाणार आहे. यापुढील मोहीम १५ दिवसांनी ताथवडे येथे राबविण्यात येणार आहे.
- धनंजय औंढेकर,
कार्यकारी अभियंता