पीएमपी च्या ई-बससाठी आणखी सहा आगार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 07:00 AM2019-12-09T07:00:00+5:302019-12-09T07:00:02+5:30
देशातील पहिले ई-बस आगार म्हणून पीएमपीच्या भेकराईनगर आगाराला मान
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या ताफ्यात पुढील काही महिन्यांत आणखी ५०० इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाने पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे नव्याने सहा आगार उभारण्याचा निर्णय घेतला आहे. चार आगारांसाठी आवश्यक जागाही ‘पीएमपी’ला मिळाली असून उर्वरीत दोन जागाही लवकरच मिळतील. त्यानुसार पुढील काही दिवसांत याठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
देशातील पहिले ई-बस आगार म्हणून पीएमपीच्या भेकराईनगर आगाराला मान मिळाला आहे. त्यापाठोपाठ निगडी आगारातही केवळ ई-बस दिल्या आहेत. सध्या पीएमपीच्या ताफ्यात सुमारे १२० ई-बस आहेत. पहिल्या टप्प्यातील १२ मीटर लांबीच्या आणखी ३० बस मिळणार आहेत. एवढ्यावरच न थांबता पीएमपीच्या ताफ्यात आणखी ५०० ई-बस टप्याटप्याने दाखल होणार आहेत. त्यापैकी ३५० बस दोन्ही महापालिकांमार्फत तर १५० बस केंद्र सरकारच्या ‘फेम’ योजनेअंतर्गत भाडेतत्वावर घेतल्या जाणार आहेत. या बससाठीची निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. ३५० बसची प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात आल्याने लवकरच या बस ताफ्यात येण्यास सुरूवात होईल. सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर ई-बस मार्फत शहर वाहतुक देशातील कोणत्याही शहरात होत नाही. त्यामुळे पुण्यातील ई-बसच्या कार्यक्षमतेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यापार्श्वभूमीवर ‘पीएमपी’ प्रशासनाने ई-बससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी नव्याने सहा आगारांची उभारणी केली जाणार आहे. या आगारांमध्ये भेकराईनगर व निगडी प्रमाणे केवळ ई-बस असतील. सध्या पीएमपीचे एकुण १३ आगार आहेत. नवीन आगारांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील प्रत्येकी तीन जागा निश्चित केल्या आहेत. पुणे कार्यक्षेत्रामध्ये बाणेर, वाघोली व सुतारवाडी येथे तर पिंपरी चिंचवडमध्ये चºहोली, पिंपळे सौदागर व भोसरी-मध्यवर्ती केंद्र येथील जागांचा त्यामध्ये समावेश आहे. वाघोली येथील ३ एकर जागेमध्ये सर्वाधिक ११५ बस पार्किंगची क्षमता आहे. भोसरी येथे सर्वात कमी २ एकर जागा असून तिथे ६० बस पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. यातील बहुतेक जागा पीएमपीला मिळाल्या आहेत. त्यामुळे लवकरच याठिकाणी सुविधा उभारण्याचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.
----------------
दुसºया टप्यातील ३५० बीआरटी ई-बससाठी
डेपोचे नाव क्षेत्र (एकर) बस पार्किंग क्षमता
बाणेर स. नं. १११ २.५० ९५
वाघोली ३.०० ११५
चºहोली स.न.१२९,१३० ३.५० ७०
पिंपळे सौदागर ३.०० ७०
----------------------------------------
‘फेम’ योजनेतील १५० बीआरटी ई-बससाठी
डेपोचे नाव क्षेत्र (एकर) बस पार्किंग क्षमता
सुतारवाडी-पाषाण सूस ३.०० ९०
रोड
भोसरी-मध्यवर्ती सुविधा २.०० ६०
केंद्र
------------------------------------------