भोरला वर्षभरात सहा बळी

By admin | Published: October 13, 2016 02:18 AM2016-10-13T02:18:34+5:302016-10-13T02:18:34+5:30

खोदून ठेवलेले रस्ते, चाऱ्या, उगवलेली झाडेझुडपे, पुलांना संरक्षक कठडे नाहीत, सूचना फलक, गटारे काढलेली नाहीत, तर जीर्ण झाडे रस्त्यावर पडलेली...असा कारभार

Six people have died this year | भोरला वर्षभरात सहा बळी

भोरला वर्षभरात सहा बळी

Next

भोर : खोदून ठेवलेले रस्ते, चाऱ्या, उगवलेली झाडेझुडपे, पुलांना संरक्षक कठडे नाहीत, सूचना फलक, गटारे काढलेली नाहीत, तर जीर्ण झाडे रस्त्यावर पडलेली...असा कारभार सार्वजनिक बांधकाम विभागाचा सुरू असून, यामुळे वर्षभरात अपघातांत सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. यात तीन तरुण, एक महिला, एक पुरुष व एका लहान मुलाचा समावेश आहे.
या शिवाय चारचाकी गाड्या पुलावरून खाली पडून, दुचाकी गाड्या घसरून अनेकजण जखमी, तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. नुकत्याच झालेल्या एका अपघात प्रकरणी उपअभियंत्यावर गुन्हा दाखल करा, अशी तक्रार भोर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांनी ३0४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
महाड-पंढरपूर रोडवर नांदगाव, आपटी व भोर-आंबवडे रोडवर अनेक ठिकाणी शेतीची पाइपलाइन टाकण्यासाठी चाऱ्या काढल्या आहेत. मात्र, त्या व्यवस्थित बुजवल्या नाहीत. त्यामुळे दुचाकी, चारचाकी गाड्यांचे अपघात घडतात. नांदगाव येथील काढलेल्या चारीच्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने महाडला जाणारा दुचाकीस्वार खड्ड्यत पडला आणि समोरून येणारा टेम्पो अंगावरून गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर आंबेघर येथील नीरानदीवरील पुलाजवळ संरक्षक कठडे नसल्याने गेल्या वर्षी पहाटेच्या वेळी चारचाकी गाडी नीरानदीत पडून गाडीतील दोन पुरुष व दोन महिलांचा, एक वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र, त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही.
भोर-कापूरव्होळ, भोर-शिरवळ रोडवर जुनी झाडे वाळली असून, कधीही पडण्याच्या अवस्थेत आहेत. खड्डे पडले आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
तीन दिवसांपूर्वी भोर शहरातील भोर-शिरवळ रस्त्यावर एसटी डेपोजवळ भर रस्त्यात सकाळी ११ वाजता पडलेले बाभळीचे झाड सार्वजनिक बांधकाम
विभागाने काढले नाही आणि दुचाकी घसरुन अपघात झाले. तरीही ती झाडे न काढल्याने रात्री एक दुचाकी
झाडवर आदळून अपघात झाला.
यात राहुल दुरकर हा तरुण जागीच ठार झाला, तर अक्षय महांगरे गंभीर जखमी झाला.
यामुळे जखमी तरुणाचे चुलते चंद्रकांत महांगरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धारणे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शंकर दराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यानुसार पोलिसांनी कामात हलगर्जीपणा केल्या बद्धल ३0४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Six people have died this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.