पोलीस पाटलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल
By admin | Published: June 2, 2017 01:47 AM2017-06-02T01:47:08+5:302017-06-02T01:47:08+5:30
७० हजारांचे मक्याचे पीक चोरून नेल्याच्या आरोपावरून तालुक्यातील बेडशिंगे गावच्या पोलीस पाटलासह सहा जणांवर बुधवारी (दि.३१) इंदापूर
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : ७० हजारांचे मक्याचे पीक चोरून नेल्याच्या आरोपावरून तालुक्यातील बेडशिंगे गावच्या पोलीस पाटलासह सहा जणांवर बुधवारी (दि.३१) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पांडुरंग दत्तात्रय गिरी (पोलीस पाटील), निळकंठ दत्तात्रय गिरी, दिलीप शंकर बन, अनिता दिलीप बन, ओंकार दिलीप बन, ऋषीकेश दिलीप बन (सर्व रा. बेडशिंगे) अशी आरोपींची नावे आहेत. अमोल सत्यवान बन (रा.बेडशिंगे) यांनी त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
फिर्यादी अमोल सत्यवान बन आपल्या कुटुंबासह बेडशिंग येथे राहत आहेत. शेती करून उपजीविका करत आहेत. या शेतातील काही हिश्श्याचा ताबा मिळवण्यासाठी दत्तात्रय बाबुराव गिरी व दिलीप बाबुराव गिरी (दोघे रा. बेडशिंगे) यांनी बारामती येथील दिवाणी न्यायालयात सन २०१२ साली दावा दाखल केला होता. दि.५ फेब्रुवारी २०१६ रोजी दाव्याचा निकाल फिर्यादीच्या बाजूने लागला. तेव्हापासून बन ते क्षेत्र वहिवाटत आहेत.
ऊस, गहू, ज्वारी, मका अशी पिके घेत आहेत. यंदा फिर्यादीचा भाऊ युवराज सत्यवान बन याने त्या क्षेत्रात मक्याचे पीक केले. हे अंदाजे सत्तर हजार रुपये किंमतीचे पीक पोलीस पाटील पांडुरंग दत्तात्रय गिरी व इतर आरोपींनी १५ मे रोजी जबरदस्तीने तोडून नेले. ते नेत असताना फिर्यादी व त्याच्या भावाने विचारणा केली असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. जीवे मारण्याची धमकी दिली. मका घेऊन ते निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. इंदापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.