दिघी पोलीस ठाण्यातील सहा पोलीस निलंबित
By admin | Published: April 6, 2017 08:02 PM2017-04-06T20:02:52+5:302017-04-06T20:12:18+5:30
जुगार अड्ड्यावर छापा टाकून जप्त केलेली रक्कम पोलीस ठाण्यात जमा न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. आरोपींकडून लाच स्वीकारली.
Next
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 06 - जुगार अड्ड्यावर छापा टाकून जप्त केलेली रक्कम पोलीस ठाण्यात जमा न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. आरोपींकडून लाच स्वीकारली. हे विभागीय चौकशीत निष्पन्न झाल्याने दिघी पोलीस ठाण्यातील सहा पोलिसांना बुधवारी पुणे पोलीस आयुक्तांनी निलंबित केले. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस नाईक आणि पोलीस शिपायाचा समावेश आहे.
दिघी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष काटे, पोलीस नाईक सोमनाथ बाबासाहेब बोºहाडे, नामदेव खेमा वडेकर, विपुल लंकेश्वर होले, शिवराज भगवंत कलांडीकर, पोलीस शिपाई परमेश्वर तुकाराम सोनके अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.
निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांनी ८ आॅक्टोबर २०१६ मध्ये डुडुळगाव येथे एका जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला होता. जुगार खेळणाºयांना अटक करून पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. परंतु त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली नव्हती. कारवाई दरम्यान ८९ हजार रुपयांची रक्कम जुगार अड्यावरून जप्त केली होती. जप्त करण्यात आलेली रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी पोलीस कर्मचाºयांनी वापरली. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींना कारवाईची भिती दाखवून २५हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. कर्तव्य बजावत असताना गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पुणे शहर पोलीस आयुक्तांनी सहा पोलिसांचे निलंबन केले आहे.