Pune| नर्हेमध्ये मध्यरात्री इमारतीच्या पार्किंगमधे सहा वाहनांना आग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 12:08 PM2022-09-17T12:08:19+5:302022-09-17T12:09:30+5:30
स्थानिकांनी बादली व नळीच्या साह्याने पाणी मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला...
पुणे : काल (शुक्रवारी) मध्यराञी ०२:१८ वाजता नर्हेमधील हरिहरेश्वर पार्क, बी विंग, माताजी नगर, पुणे-४१ याठिकाणी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यावेळी तत्काळ नवले अग्निशमन केंद्राचे अग्निशमन वाहन रवाना झाले. घटनासथळी पोहोचताच इमारतीच्या पार्किंगमधे वाहनांना आग लागल्याचे पाहताच जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करुन आग पूर्ण विझवत धोका दूर केला. तत्पुर्वी दलाची मदत पोहचण्याआधी स्थानिकांनी बादली व नळीच्या साह्याने पाणी मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास आले.
अग्निशमन दलाकडून वेळोवेळी शहरात राबविण्यात येणारी अग्निशमन सुरक्षाविषयक प्रात्यक्षिक व संवाद यामुळे नागरिकांमधे आग व त्याच्या सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आगीमधे ४ दुचाकी व २ चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. तसेच पार्किंगच्या वरिल सिलिंगचा काही भागाला आगीची झळ लागल्याचे दिसून आले. सदर इमारत ही तळमजला अधिक सहा मजले अशी असून आग लागल्याचे कारण समजू शकले नाही.
या कामगिरीत नवले अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश गोरे, वाहनचालक पांगारे तसेच जवान भरत गोगावले, शिंदे व मदतनीस द. नलवडे, प्र.नलवडे, वि. मछिंद्र यांनी सहभाग घेतला.