सहा वर्षांत छत्रपती कारखान्याने ३१०० रुपये कमी दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:11 AM2021-09-03T04:11:36+5:302021-09-03T04:11:36+5:30
थकीत ‘एफआरपी’च्या मुद्द्यावर ‘स्वाभिमानी’ने छत्रपती कारखान्यावर आंदोलन केले. या वेळी प्रदेशाध्यक्ष कदम यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या कारभारावर जोरदार टीका ...
थकीत ‘एफआरपी’च्या मुद्द्यावर ‘स्वाभिमानी’ने छत्रपती कारखान्यावर आंदोलन केले. या वेळी प्रदेशाध्यक्ष कदम यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या कारभारावर जोरदार टीका केली. कदम म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांना शेती करणे जिकिरीचे होत आहे. त्यातही १६ महिन्यांपर्यंत ऊस शेतात राहत असल्याने त्याचा उत्पादन खर्चही वाढत आहे. मात्र, कायद्यानुसार १४ दिवसांत सभासदांना ‘एफआरपी’ची रक्कम देणे बंधनकारक आहे. मात्र, छत्रपती कारखान्याच्या वतीने अद्याप पूर्ण ‘एफआरपी’ दिली नाही असे कदम यांनी सांगितले. कृषिमूल्य आयोगाने उसाच्या एका किलोला पाच पैसे दर वाढवून दिल्याबाबत निषेध या वेळी संघटनेच्या वतीने करण्यात आला.
मागील गळीत हंगामात सभासदांच्या उसाला कमी दर व सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून घेतलेल्या गेटकेन उसाला २८०० रुपये दर दिला गेला. याबाबत उपस्थित शेतकऱ्यांसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना नाराजी व्यक्त केली. ज्या सभासदांच्या जिवावर कारखाना चालतो, त्यांना कमी दर देऊन कारखान्याने कोणते हित साध्य केले असा सवाल यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
छत्रपती कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव, कार्यालयीन अधीक्षक अशोक मोरे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. येत्या ९ सप्टेंबर रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत आपल्या मागण्यांवर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. या वेळी कारखान्याचे फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर, संघटनेचे पुणे जिल्हा सचिव राजेंद्र सपकळ, बारामती तालुका अध्यक्ष विलास सस्ते, महेंद्र तावरे, विशाल काळे, विशाल भोईटे, राजाराम रायते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
——————————————
फोटोओळी—थकीत ‘एफआरपी’ च्या मुद्द्यावर ‘स्वाभिमानी’ने छत्रपती कारखान्यावर आंदोलन केले.यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम.
०२०९२०२१ बारामती—११