उजनी धरणाचे सोळा दरवाजे उघडले; धरण १०० टक्के भरले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 02:55 PM2019-09-16T14:55:03+5:302019-09-16T15:12:46+5:30
भीमा खोरे व घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसाने दौंड व बंडगार्डनमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढत चालली आहे.
इंदापूर : जिल्ह्यातील खडकवासला धरणसाखळीमध्ये व घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे उजनीत प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे उजनी धरण फुल्ल झाले आहे. धरणातील वाढते पाणी बघता रविवारी धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले असून, भीमा नदीमध्ये जवळपास ७० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.
भीमा खोरे व घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसाने दौंड व बंडगार्डनमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढत चालली आहे. रविवारी सकाळपासून त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामुळे सकाळी ६ वाजता ४५ हजार, १० वाजता ५० हजार, ११ वाजता ५५ हजार, १२.३० वाजता ६० हजार, ३ वाजता ६५ हजार तर सायंकाळी ५ वाजता ७० हजार क्युसेकने पाणी उजनीतून पुढे सोडण्यात आले आहे.
यामुळे उजनीतून भीमेत ७० हजार क्युसेक पाणी व सांडव्यातून, तर १६०० क्युसेक पाणी वीजनिर्मितीसाठी सोडले जात आहे. यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. दरम्यान नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नीरा साखळी धरणांवर पावसाचा जोर असल्याने वीर धरणातून काल १३ हजार व नंतर सायंकाळी ५५०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. वीर व उजनीच्या पाण्याने भीमा नदी संगमच्या पुढे ७६०० हजार क्युसेकने वाहण्याची शक्यता असल्याने सर्व बंधारे व पंढरीतील दगडी पूल पाण्याखाली जाईल. उजनी धरण पूर्ण
क्षमतेने भरल्याने येथे पाणी साठवणूक करण्यास जागा राहिली नाही. परिणामी सर्व उपसा सिचंन योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उजनीच्या अधिकाºयांनी दिली.
............
उजनी धरण भरल्यामुळे सोलापुरला फायदा होणार आहे. सद्यस्थितीतीत पाणी सोडण्यात येत असल्याने अनेक योजनांना जीवदान मिळाले आहे...
...........
पाण्याअभावी उजनीकाठची अनेक पिके संकटात आली होती. या भागात पुरेसा पाऊसही झालेला नाही. मात्र, धरण भरल्यामुळे यावर्षी पाणीटंचाई जाणवणार नाही.