सहावीच्या विद्यार्थ्याची कमाल ; लायफाय तंत्रज्ञान वापरुन तयार केले अनाेखे यंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 06:29 PM2019-12-24T18:29:02+5:302019-12-24T18:39:04+5:30
लायफाय तंत्रज्ञान वापरुन शिरुर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याने अनाेखे यंत्र तयार केले आहे.
राहुल शिंदे
पुणे : शहरातील हायटेक शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘वायफाय’ तंत्रज्ञानाबद्दल माहिती असली तरी ‘लायफाय’ तंत्रज्ञानाविषयी फारशी कल्पना नाही. मात्र, जिल्हा परिषदेतील इयत्ता सहावीमधील विद्यार्थ्याने लायफाय तंत्रज्ञानाचा वापर करून लहान बल्बच्या प्रकाशातून बाहेर पडणा-या प्रकाश हलरीच्या सहाय्याने मोबाईलमधील गाणी मोठ्या स्पिकरमध्ये वाजण्याची कमाल केली आहे.
पुणे जिल्ह्यातलच नव्हे तर राज्यातील नामांकित शाळा म्हणून शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शाळेतील विद्यार्थी विज्ञानावर आधारित अनेक नवनवीन प्रयोग करत असतात. त्यातील वेदांत वाबळे या सहावीच्या विद्यार्थ्यांने इलेक्टॉनिक वस्तूंचा वापर करून वोटिंग मशीन,व्हॅक्युम क्लिनर ,रोमोट कंट्रोल क्युब, 27 एलएडी बल्बचा मनोरा अशा वस्तू तयार केल्या आहेत. त्यामुळे शाळेत त्याला ‘छोटा सायंटिस्ट’याच नावाने ओळखले जाते.
शाळेतील विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शाशिवाय नवीन प्रयोग करू शकत नाही,असे बोलले जात असले तरी लायफाय तंत्रज्ञान म्हणजे नेकमे काय? लायफाय नेमके कसे कार्य करते ? प्रकाश लहरी सोलर पॅनलवर पडल्यावर काय होते ? याबाबत वेदांतने युट्युबवरील व्हिडीओ पाहिले. त्यानुसार प्रयोग करून त्याने शाळेतील साऊंड,सोलर पॅनल,एक लहान बल्ब, एक इलेक्टॉनिक कीट घेतले. मोबाईलच्या कॉडला बल्ब जोडला. या बल्बमधून पडणारा प्रकाश सोलर पॅनलवर पडला की मोबाईलमध्ये सुरू असलेल्या गाण्याचा आवाज साऊंडमध्ये वाजतो.मात्र,बल्बच्या प्रकाशासमोर हात ठेवल्यानंतर साऊंडमधील गाणे बंद होते.
जिल्हा परिषदेची शाळा म्हटले की अनेकांच्या डोळ्यासमोर जुनी इमारत उभी राहते.मात्र,वाबळेवाडीच्या शाळेने अशा अनेक कल्पनांना छेद दिला आहे.शाळेत वेदांतमुळेच ‘आविष्कार लॅब’ तयार झाली.या लॅबमध्ये आता अनेक विद्यार्थी विज्ञानाशी निगडीत नवनवीन प्रयोग करण्यात दंग असल्याचे दिसते. त्यातील वेदांत असाच एक शांत आणि इलेक्टॉनिक वस्तू सहजपणे हाताळणारा विद्यार्थी आहे.वेदांत सध्या सी, सी प्लस,प्लस आणि जावा या कॅम्प्युटर लॅग्वेजच्या सहाय्याने कोडींग करून इलेक्टॉनिक वस्तू उपयोगात आणत आहे.त्याने रोमोट कंट्रोल क्युब एक हजार पध्दतीने प्रज्वलीत करून दाखवले आहे.
वेदांतमुळे सुरु झाली आविष्कार लॅब
तिसरी चौथीपासूनच वेदांत वाबळे हा विद्यार्थी इलेक्टॉनिक वस्तू हातळत असल्याचे लक्षात आले.वेदांतमुळेच शाळेने आविष्कार लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला.त्याने अनेक प्रकल्प तयार करून सर्वांनाच चकीत केले.वेदांतसह आणखी सहा विद्यार्थ्यांनी सोलर इलेक्ट्रोक स्कूटर तयार केली आहे.वेदांत पुढील काळात वैज्ञानिक क्षेत्रात चांगली कामगिरी करून दाखविल.
- दत्तात्रय वारे,मुख्याध्यापक,वाबळेवाडी शाळा.