एमपीएससी करणाऱ्या साठ टक्के मुलांकडे नाही ‘प्लॅन-बी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:11 AM2021-07-31T04:11:14+5:302021-07-31T04:11:14+5:30
अभिजित कोळपे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील जवळपास पंधरा-सोळा लाख विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) तयारी करत आहेत. ...
अभिजित कोळपे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील जवळपास पंधरा-सोळा लाख विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) तयारी करत आहेत. मात्र, एमपीएससीच्या परीक्षा वेळेवर होत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर एमपीएससी व्यतिरीक्त विद्यार्थ्यांकडे दुसरा पर्याय आहे का याबाबत ऑनलाइन पाहणी करण्यात आली. त्यात जवळपास ६० टक्के विद्यार्थ्यांकडे ‘प्लॅन-बी’ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘प्लॅन-बी’ बाबत पुण्यातील सत्यम जोशी आणि पुष्कर खवसे या दोन तरुणांनी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण केले. त्यातून ही निरिक्षणे समोर आली आहेत. ज्या वयात करिअर घडवायचे असते, तीच उमेदीची वर्षे ‘एमपीएससी’च्या नादात वाया जातात. एमपीएससी/यूपीएससी अथवा अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी यापुढे ‘प्लॅन-बी’ची तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा चरितार्थाचा तसेच इतर सामाजिक, मानसिक समस्या निर्माण हाेऊ शकतात, असे या पाहणीतून समजल्याचे सत्यम जोशी यांनी म्हटले.
चौकट
हे होते ऑनलाईन प्रश्न
-स्पर्धा परीक्षांची तयारी किती वर्षांपासून करता?
-राज्य शासनाकडून तुमच्या अपेक्षा काय? -
-स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी साेशल मीडिया वापरता का? असल्यास कोणते माध्यम?
-एमपीएससीत पद न मिळाल्यास करिअरच्या दृष्टीने दुसरा ‘प्लॅन-बी’आहे का?
-अन्य ठिकाणी नोकरी अथवा व्यवसायाचे काही पर्याय आहेत का?
चौकट
अशी आहेत उत्तरे
१) ‘प्लॅन-बी’ आहे : ४१.८ टक्के
२) ‘प्लॅन-बी’ नाही : ३२.३ टक्के
३) ‘प्लॅन-बी’ म्हणजे काय हेच माहीत नाही : २५.९ टक्के
चौकट
किती वर्षांपासून तयारी चालू? (टक्के)
१) ० ते २ वर्षे : ६२.७
२) २ ते ५ वर्षे : ३०.४
३) ५ वर्षांपेक्षा जास्त : ७
चौकट
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी कोणते साधन वापरता?
१) क्लास : ४४.३ टक्के
२) पुस्तके/नोट्स : ८८.६ टक्के
३) चर्चासत्र : २८.५ टक्के
४) सोशल मीडिया : ६४.६ टक्के
५) वर्तमानपत्र : ५६.३ टक्के