शर्टवर घाण पडली सांगून ६० हजार लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 20:07 IST2019-07-23T20:00:51+5:302019-07-23T20:07:48+5:30
शर्टवर घाण पडली म्हणून पाठीवर असलेली बॅग दुचाकीला अडकवून शर्ट धुण्यासाठी बाजूला गेल्याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी ६०हजार रुपये रोख रक्कम ठेवलेली बॅग चोरून नेली असल्याची घटना ऊरूळी कांचन येथे सकाळचे सुमारास घडली आहे.

शर्टवर घाण पडली सांगून ६० हजार लंपास
लोणी काळभोर : शर्टवर घाण पडली म्हणून पाठीवर असलेली बॅग दुचाकीला अडकवून शर्ट धुण्यासाठी बाजूला गेल्याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी ६०हजार रुपये रोख रक्कम ठेवलेली बॅग चोरून नेली असल्याची घटना ऊरूळी कांचन येथे सकाळचे सुमारास घडली आहे.
या संदर्भात प्रदीप भगवान देशमुख ( वय २९, रा. शिंदवणे, ता हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकार २२ जुलै रोजी सकाळी १० -वाजण्याच्या सुमारास ऊरूळी कांचन मधील आश्रम रोडवर घडला आहे. देशमुख हे पोस्ट खात्यात हंगामी पोस्टमन मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आयडीबीआय बॅक खात्यात पैसे जमा करावयाचे आहेत म्हणून त्यांनी इलाईट चौक आश्रम रोड येथील जिल्हा बॅंकेचे खात्यातून ६० हजार रुपये काढले होते. पैसे काढलेनंतर त्यांनी ते ऑफिस बॅगमध्ये ठेवले. बॅग पाठीवर अडकवून ते बॅकेचे बाहेर पडले.
ते आपली दुचाकी स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एमएच १२ जीजे ३५१९ वरून आश्रम रोडने आय डी बी आय बॅकेकडे जात असताना मागून दुचाकीवरून आलेल्या एका मुलाने त्यांना गाडीचे पाठीमागील सिटवर घाण पडली असल्याचे सांगितले. देशमुख यांनी आपली दुचाकी रस्त्याचे कडेला लावून स्विट होम मधून पाणी आणले व सिटवर टाकले. त्यानंतर तो मुलगा परत त्यांचेजवळ आला व शर्टचे पाठीमागे घाण पडली असल्याचे सांगितले. हे ऐकताच देशमुख यांनी ऑफिस बॅग दुचाकीचे हॅन्डसेटला अडकवून पुन्हा स्विट होम कडे गेले शर्ट साफ करून ते परत दुचाकीपाशी आले त्यावेळी त्यांना ऑफिस बॅग दिसली नाही म्हणून त्यांनी आजुबाजुला शोध घेतला परंतू मिळून आली नाही . म्हणून त्यांनी ऊरूळी कांचन दूरक्षेत्रात जावून ६० हजार रुपये रोख रकमेसह पोस्टाची कागदपत्रे व मुथुट फायनान्समध्ये सोन्याची अंगठी ठेवलेली पावती असा सर्व ऐवज ठेवलेली ऑफिस बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद दिली आहे.