New Year Motivation: बासष्ठीतील तरुण करताेय राेज सिंहगडाची सफर; तब्बल १५१ वेळा चढाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 12:20 PM2023-01-01T12:20:40+5:302023-01-01T13:00:07+5:30
अवघ्या ४५ ते ५० मिनिटांतच गड पूर्ण करतात
अजित घस्ते
पुणे : सिंहगड एकदा पायी सर करायचा म्हटलं तरी तरुणाईच्याही अंगावर काटा येताे. अनंत अगरखेडकर हा ६२ वर्षाचा ‘तरुण’ मात्र अपवाद ठरत आहे. शारीरिक चपळाई आणि तंदुरूस्तीच्या जाेरावर ३ ऑगस्ट २०२२ पासून ते दरराेज सिंहगड पायी चढत आहेत. गतवर्षात त्यांनी १५१ वेळा सिंहगड सर केला आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत हा उपक्रम कायम ठेवत सलग २२३ वेळा सिंहगड सर करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
पुण्यातील एका बांधकाम कंपनीतून दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक अनंत अगरखेडकर यांनी ३ ऑगस्ट २०२२२ पासून सिंहगड किल्ला पायी सर करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांच्या १५१ फेऱ्या पूर्ण झाल्या. त्या २२३ वेळा सलग पूर्ण करण्याचा त्यांचा नववर्षाचा संकल्प केला आहे.
या संकल्पपूर्ततेनिमित्त मित्रमंडळाने जल्लोष करण्यासाठी मोठी तयारी केली होती. यामध्ये सिंहगड परिवार, यंग सिनिअर सायकलिस्ट ग्रुप, सह्याद्री भ्रमण मंडळ, मूनलाईट वॉकिंग ग्रुप आदी संघटनांचे सदस्य आणि त्यांचा मित्र परिवार सोबत होते. यावेळी स्वयंसेवी संस्थांच्या १०० हून अधिक सदस्यांनी त्यांच्यासमवेत गड सर करून साथ देत असतात.
अगरखेडकर हे मूनलाईट वॉकिंग ग्रुपचे संस्थापक-सदस्य आहेत. रोजच्या चालण्याच्या व्यायामासोबत ते मित्रांसमवेत आठवड्यातून तीन दिवस तळजाई टेकडीवर जातात. दर पौर्णिमेला रात्री १२ वाजता राजाराम पुलापासूनच सिंहगडापर्यंत व संपूर्ण सिंहगड पायी चालत सर करीत असतात. तर, वर्षातून एकदा लोणावळा-पुणेदरम्यान चालत ते भटकंती पूर्ण करतात.
राेजचा असा आहे दिनक्रम
सकाळी पहाटे ५ वाजता राजाराम पुलावरून पीएमपी बसने प्रवासाला सुरुवात करतात. तर सिंहगड पायथ्याला पावणेसात वाजता पोहोचतात. ते ७ वाजता गड चढायला सुरुवात करतात. अवघ्या ४५ ते ५० मिनिटांतच गड पूर्ण करीत पावणेआठ वाजता गडावर पाेहोचतात. तेथे १० मिनिटे थांबून पुन्हा ८ वाजता खाली उतरायला सुरुवात करतात. ३० मिनिटांतच खाली येऊन पुन्हा पावणेनऊच्या बसने पुण्यात येतात.
धावपळीच्या जीवनात तरुण पिढीने आरोग्याकडे विशेष लक्ष द्या
नव्या पिढीत चालण्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने सलग २२३ दिवसांचा संकल्प केला आहे. त्यापैकी गेल्या वर्षात १५१ फेऱ्या सलग पूर्ण झाल्या आहेत. या प्रवासात कधी एकटा होतो तर कधी अनोळखी मित्र हाेते. या धावपळीच्या जीवनात तरुण पिढीने आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, हीच अपेक्षा आहे. -अनंत अगरखेडकर, सिंहगड ट्रेकर