गुळूंचवाडीत रंगला कुस्त्यांचा आखाडा
By Admin | Published: March 31, 2017 11:48 PM2017-03-31T23:48:41+5:302017-03-31T23:48:41+5:30
गुळूंचवाडी (ता. जुन्नर) येथे श्री मळगंगा देवी व कानिफनाथाच्या यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन केले होते
बेल्हा: गुळूंचवाडी (ता. जुन्नर) येथे श्री मळगंगा देवी व कानिफनाथाच्या यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन केले होते.
या निमित्त सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कलगीवाले शाहीर जयसिंग माळवतकर आणि पार्टी व तुरेवाले शाहीर रामदास गुंड आणि पार्टी यांचा कलगी तुऱ्याचा सामना रंगला. तसेच त्यानंतर शाहीर ठकसेन शिंदे यांचा भेदिक गाण्यांचा कार्यक्रम झाला. या काळात युवा नेते अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, पंचायत समिती सदस्य अनघा घोडके व सरपंच मंगल गोसावी यांनी भेटी दिल्या. त्यानंतर शेरणी वाटप व रात्री काठ्या पालखीची भव्य मिरवणूक झाली. त्यानंतर मनोरंजनासाठी भिका भीमा सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन केले.
या आखाड्यात नामवंत मल्लांनी भाग घेतला होता. राज्यभरातून मल्लांनी या आखाड्यात सहभाग नोंदविण्यासाठी हजेरी लवली. या भागात हा सर्वांत मोठा आखाडा भरतो. या ठिकाणी अगदी ५० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या. काही कुस्त्या निकाली झाल्या त्यांना ग्रामस्थांच्या वतीने रोख इनाम देण्यात आले.
पंच म्हणून पांडुरंग गाडेकर, संतोष शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी विठ्ठल गुंजाळ, अतुल भांबेरे, भाऊसाहेब भांबेरे, काशिनाथ गुंजाळ, तुळशीराम गुंजाळ, दगडू काळे, अशोक गोसावी रंगनाथ भांबेरे, संतोष आग्रे, विजय गुंजाळ आदी उपस्थित होते.