कौशल्य-शिक्षण, इनोव्हेशनवर भर हवा! -डॉ. माणिकराव साळुंखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 02:16 AM2018-01-28T02:16:04+5:302018-01-28T02:16:30+5:30
जगभरातील विकसित राष्ट्रांमधील शिक्षणपद्धतीचा विचार केला तर भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये कौशल्य-शिक्षण व इनोव्हेशनवर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देऊन चालणार नाही तर त्यांना रोजगारक्षम बनविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्याचप्रमाणे सर्वच शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधनात्मक वातावरण कसे निर्माण होईल, याकडे लक्ष केंद्रित करून
जगभरातील विकसित राष्ट्रांमधील शिक्षणपद्धतीचा विचार केला तर भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये कौशल्य-शिक्षण व इनोव्हेशनवर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देऊन चालणार नाही तर त्यांना रोजगारक्षम बनविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्याचप्रमाणे सर्वच शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधनात्मक वातावरण कसे निर्माण होईल, याकडे लक्ष केंद्रित करून शिक्षक व विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण संशोधन करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे, असे भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
डॉ. साळुंखे म्हणाले, की भारत, पाकिस्तान, बांगलादेश यांसारख्या देशांमधील शिक्षणपद्धतीतून विद्यार्थ्यांना केवळ माहिती दिली जाते. तर कोरिया, चीन, जपान या देशांमध्ये कौशल्यावर भर देण्यात आला आहे. परंतु, अमेरिकेसारख्या देशात कौशल्याबरोबरच इनोव्हेशनला अधिक महत्त्व दिले आहे. त्यामुळे भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये कौशल्य व इनोव्हेशनला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.
विद्यार्थ्यांची ज्ञान आत्मसात करण्याची मानसिकता बदलत चालली आहे. विद्यार्थी दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ एकाच विषयावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून शिकवलेले समजले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकसलग न शिकवता वर्गात काही काळ अवांतर ज्ञान देऊन शिकवले पाहिजे, असे नमूद करून साळुंखे म्हणाले, ‘कॉर्पोरेटिव्ह लर्निंग’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयांचे मार्गदर्शन करण्यावर भर द्यायला हवा. विद्यार्थ्यांना एखादा विषय शिकवण्यापूर्वी त्यासंदर्भातील व्हिडिओ दाखवावा व आवश्यक माहिती द्यावी. त्यानंतर विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांना विषय समजावून सांगायला हवा . भारती विद्यापीठातर्फे या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भारतीय विद्यापीठांसह जगभरातील काही नामांकित विद्यापीठांकडून ‘मूक्स’च्या माध्यमातून विविध आॅनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जात आहेत, असे स्पष्ट करून साळुंखे म्हणाले, भारती विद्यापीठानेसुद्धा आॅनलाईन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. तसेच सध्याच्या शिक्षकांना अध्यापनाबाबत प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यातून शिक्षकांचा दृष्टिकोन बदलण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी नाही, तर विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्याची महत्त्वाची जबाबदारी सर्व शिक्षकांनी स्वीकारली पाहिजे, असे स्पष्ट करून साळुंखे म्हणाले, भारती विद्यापीठातील काही संस्थांमध्ये केवळ संशोधनच केले जाते. मात्र, त्यात काही बदल करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठाच्या काही संस्थांमध्ये संशोधनाला पूरक वातावरण आहे. परंतु, त्याला व्यापक स्वरूप दिले जात असून, विद्यार्थी व प्राध्यापकांकडून संशोधन प्रकल्प मागविले जात आहेत. त्यातील चांगल्या व निवडक प्रकल्पांना मानधन देऊन संशोधनासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्याच प्रमाणे एकाच एका विद्याशाखेतील साचेबद्ध संशोधन न करता आंतर्विद्याशाखीय संशोधन करण्याकडे लक्ष दिले जात आहे. साळुंखे म्हणाले, भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांना एनआयआरएफ रँकिंग मिळाले आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक संस्थांकडे पायाभूत सुविधा आहेत. मात्र, या सुविधांचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक लाभ कसा घेत येईल, यादृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार एखादा विद्यार्थी वर्गात उपस्थित राहू शकला नाही तर त्याला प्राध्यापकांचे रेकॉर्ड केलेले लेक्चर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येतोय. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील संवाद तुटत चालला आहे. मात्र, या दोघांमध्ये गुरूशिष्याचे नाते निर्माण करून विचारांची देवाण-घेवाण होणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजातील गरीब व दुर्लक्षित घटकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.