World Youth Skills Day: पुण्यातून तब्बल १ लाख बांधकाम कामगारांना कौशल्य प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 03:07 PM2022-07-15T15:07:04+5:302022-07-15T15:07:17+5:30
जागतिक कौशल्य दिनानिमित्त कुशल क्रेडाईचा उपक्रम
पुणे : बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या कामाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देत त्यांचा विकास करण्याच्या प्रयत्नात पुण्यामध्ये तब्बल १ लाख बांधकाम कामगारांना कुशल करण्यात आले आहे. कुशल क्रेडाई या संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रशिक्षण घेतलेल्या या सर्व कामगारांना उत्तम रोजगार मिळाला असून, ते चांगले उत्पन्न मिळवत आहेत.
जागतिक कौशल्य दिनानिमित्त (शुक्रवार, १५ जुलै) संस्थेच्या वतीने ही माहिती देण्यात आली. बांधकाम क्षेत्रातील कामगारांना असे कौशल्य विकास प्रशिक्षण देणारी ही पहिलीच संस्था आहे. बांधकाम कामगारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण राबवत कुशल क्रेडाईने गेल्या ११ वर्षांत तब्बल एक लाखाहून अधिक बांधकाम कामगारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
संस्थेच्या कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ यांनी सांगितले की, सन २०१०मध्ये नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना झाली. त्यावेळी क्रेडाई पुणे मेट्रोने २०० कामगारांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव दिला होता. क्रेडाईचे तत्कालीन अध्यक्ष सतीश मगर यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. तेव्हापासून सुरू असलेल्या या वर्गात आतापर्यंत १ लाख कामगारांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.
ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रिया आणि इटली येथे होणाऱ्या टाइलिंग आणि ब्रिकलिंग या जागतिक स्पर्धांमध्ये ‘कुशल’च्या दोन टीम सहभागी होतील, अशी माहितीही श्रॉफ यांनी दिली. भविष्यात नवोदित अभियंत्यांसाठी संस्थेच्या वतीने ‘अपस्किलिंग’ अर्थात कौशल्य वृद्धी प्रशिक्षण आयोजित करणार आहोत. एमआयटी विद्यापीठाच्या साह्याने विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.