पारंपारिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधिष्ठित शिक्षण आवश्यक : अरूण फिरोदिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 01:38 PM2018-02-01T13:38:54+5:302018-02-01T13:41:54+5:30
कॉन्टिनेंटल प्रकाशनातर्फे डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘आयटी करिअर्स २०२०++’ या पुस्तकाचे प्रकाशनअरुण फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे : एक पदवी संपादीत केली आणि त्या पदवीच्या ज्ञानाच्या आधारावर तुमचे पुढील आयुष्य सुखकर होईल हे दिवस गेले असून, आज स्पर्धेमध्ये टिकून राहायचे असेल तर परकीय भाषांसह कौशल्याधिष्ठित शिक्षण घेणे क्रमप्राप्त झाले असल्याचे डॉ. अरुण फिरोदिया यांनी सांगितले.
कॉन्टिनेंटल प्रकाशनातर्फे डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘आयटी करिअर्स २०२०++’ या पुस्तकाचे प्रकाशनअरुण फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी, कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या संचालिका देवयानी अभ्यंकर-कुलकर्णी, अनंत सरदेशमुख, लेखक डॉ. दीपक शिकारपूर आदी मान्यवर उपस्थित होते.
फिरोदिया म्हणाले, एकविसावे शतक हे भारताचे असणार आहे, असे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळीस एकविसाव्या शतकात वावरणारी पिढी ही तंत्रज्ञान आणि विज्ञानातून जन्माला येणाऱ्या ज्ञानावर पोसलेली पिढी असली पाहिजे. पांरपरिक शिक्षण हे आवश्यक आहेच. कारण एक सर्वसाधारण कॉमन सेन्स विकसित होण्यासाठी ते आवश्यक असते, परंतू त्या कॉमन सेन्स सोबत स्किल सेन्स देखील विकसित असणे गरजेचे आहे. जग हीच आपली बाजारपेठ असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात कौशल्य असणाऱ्यांनाच भविष्य असणार आहे. कोणत्याही कामाची लाज न बाळगता त्या क्षेत्रात सर्वोत्तम होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मनोज जोशी म्हणाले, की कोणतेही काम कमी किंवा मोठ्या दर्जाचे नसते, तर ते काम करणाऱ्या व्यक्तिच्या कौशल्यावर त्या कामाची गुणवत्ता ठरत असते. आणि तांत्रिक कौशल्याप्रमाणेच माणसाच्या स्वभावातील कौशल्ये त्या व्यक्तीच्या कामावर परिणाम करीत असतात. त्यामुळे या दोन्हीबाबत सजग असणारी व्यक्ती हमखास यशस्वी होते.
डॉ. दीपक शिकारपूर यांनी आपण स्मार्ट उपकरणांचा व्यक्तिंच्या प्रयोजनासाठी उपयोग करणे अपेक्षित असतांना आज आपण आपल्या जवळच्या व्यक्तिंचा उपयोग करुन घेता आणि उपकरणांवर प्रेम करतो. आॅटोमेशन इतक्या झपाट्याने सर्वच क्षेत्रात होत आहे त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया ही निरंतर सुरु राहणारी प्रक्रिया झाली आहे कॅशलेस व्यवहाराकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. भविष्यात चोरांना चोरी जरी करायची झाल्यास त्याला आधी संगणक शिकावे लागेल असे सांगितले.
यावेळी कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या संचालिका देवयानी अभ्यंकर-कुलकर्णी यांनी प्रकाशकिय मनोगत व्यक्त केले.