महिला कैद्यांना कुशल रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 01:17 AM2018-04-10T01:17:30+5:302018-04-10T01:17:30+5:30
येरवडा मध्यवर्ती कारागृहासमोरील महिला कारागृहात दुचाकी वाहनांच्या चाव्यांचा म्हणजेच ‘इलेक्ट्रॉनिक की सेट’चा प्रकल्प सुरू होणार आहे.
येरवडा : येरवडा मध्यवर्ती कारागृहासमोरील महिला कारागृहात दुचाकी वाहनांच्या चाव्यांचा म्हणजेच ‘इलेक्ट्रॉनिक की सेट’चा प्रकल्प सुरू होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे १५ महिला कैद्यांना प्रशिक्षण देऊन कुशल प्रशिक्षित करण्याबरोबरच त्यांना रोजगारप्राप्तीही होणार आहे. येरवडा कारागृहात कैैद्यांसाठी विविध प्रकारचे कौशल्य देण्यात येत आहे. त्यातीलच हा एक वेगळा प्रकल्प असणार आहे.
दुचाकी वाहनांना लागणाऱ्या चाव्यांचे ‘सेट’ तयार करण्याचे काम ‘मिंडा स्पार्क प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी करते. या कंपनीने महिला कारागृहात हे सेट बनवण्याचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाला दिला होता. या प्रस्तावास कारागृह प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर प्रकल्प उभारणीच्या जागेलाही मान्यता देण्यात आली. या कंपनीने काही महिन्यांपूर्वी एका कंपनीच्या चारचाकी मोटारीला लागणाºया वायरिंगचा प्रकल्प येरवडा मध्यवर्ती कारागृहात उभारला आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्याने कंपनी व्यवस्थापनाने महिला कारागृहात दुचाकीच्या इलेक्ट्रॉनिक चावी सेट बनवण्याचा प्रकल्प सुरू करण्याचा मानस व्यक्त केला होता.
येरवडा कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार म्हणाले की, सुरुवातीला कारागृहातील १५ महिला कैद्यांना या प्रकल्पात प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर या प्रशिक्षित महिलांकडून कंपनीच्या अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक चावी सेट तयार करून घेतले जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर महिला कैद्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. यातील किमान ३५ महिलांना कंपनीच्या प्रकल्पात काम दिले जाणार आहे.
या कामाच्या मोबदल्यात कंपनीकडून कारागृहाला प्रतिमहिला अडीचशे रुपये दररोजप्रमाणे पैसे मिळणार आहेत. यातील प्रत्येक महिला कैद्याला रोजगार म्हणून ६१ रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करणार येतील. त्यामुळे महिला कैद्यांना हक्काचा रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.
>सुरुवातीला कारागृहातील १५ महिला कैद्यांना या प्रकल्पात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर या महिलांकडून इलेक्ट्रॉनिक चावी सेट तयार करून घेण्यात येतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर महिला कैद्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे.
- यू. टी. पवार, अधीक्षक,
येरवडा कारागृह