‘डीआरडीओ’ने व्यापले आकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:16 AM2020-12-30T04:16:27+5:302020-12-30T04:16:27+5:30

तीन महिन्यांत २० पेक्षा अधिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या : सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या चाचण्यांतून चीनला इशारा निनाद देशमुख लोकमत न्यूज नेटवर्क पुणे ...

The sky is covered by DRDO | ‘डीआरडीओ’ने व्यापले आकाश

‘डीआरडीओ’ने व्यापले आकाश

Next

तीन महिन्यांत २० पेक्षा अधिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या : सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या चाचण्यांतून चीनला इशारा

निनाद देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लडाख सीमेवर तणाव असताना संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत तब्बल २० हून अधिक क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या करत इतिहास घडवला आहे. एवढ्या कमी कालावधीत क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या करणारा भारत एकमेव देश ठरला आहे. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या चाचण्यांनी शत्रूला धडकी भरणार आहे. यासोबतच कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास भारत सक्षम असल्याचा संदेशही दिला आहे.

लेह आणि लडाख सीमेवर भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे आहे. दोन्ही देशांतील तणाव बघता ‘डीआरडीओ’ने केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांना सामारिक महत्त्व आहे. याबरोबरच क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात देश आघाडीवर असल्याचा संदेशही जगात पोहोचला आहे. ‘डीआरडीओ’ने जानेवारी २0२0 मध्ये क्षेपणास्त्र चाचण्यांना सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे नियोजित क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांना विलंब झाला. जवळपास पाच ते सहा महिन्यांनंतर सप्टेंबरपासून पुन्हा चाचण्या सुरू झाल्या. सप्टेंबरपासून आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. आत ब्राह्मोस स्वनातीत क्षेपणास्त्र, रणगाडाभेदी क्षेपणास्त्र, पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्र, एअर डिफेन्स यंत्रणा, निर्भय क्षेपणास्त्र, शौर्य क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.

------

पुण्याचा महत्त्वाचा सहभाग

‘डीआरडीओ’ने केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांत पुण्याचा मोलाचा वाटा राहिला आहे. क्षेपणास्त्रासाठी लागणारे इंधन आणि लॉचिंग यंत्रणा पुण्यातील उच्च ऊर्जा पदार्थविज्ञान संस्था, एआरडीई, तसेच आर अँड डीई या प्रयोगशाळांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

---

कोट

क्षेपणास्त्राच्या तंत्रज्ञानात एवढ्या कमी वेळात मोठ्या प्रमाणात चाचण्या करून ‘डीआरडीओ’ने एक पल्ला गाठला आहे. या क्षेपणास्त्राच्या उत्पादनाची क्षमताही वाढवायला हवी. यातून शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होणार आहोत.

- दत्तात्रय शेकटकर, निवृत्त लेफ्टनंट जनरल

---

चौकट

‘डीआरडीओ’ने जानेवारी महिन्यात के-४ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. पाणबुडीवरून डागण्यात आलेले हे क्षेपणास्त्र साडेतीन हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकते.

७ सप्टेंबरला हायपरसॉनिक तंत्रज्ञानावर आधारित अमानवी वाहनांची चाचणी घेतली. या वाहनाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा सहापटीनं अधिक आहे.

२२ सप्टेंबरला अभ्यास (हायस्पीड एक्सपान्डेबल एरिअरल टारगेट) या ड्रोन उपकरणाची आणि रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. अभ्यास या क्षेपणास्त्राचा वेध घेणाºया उपकरणाची चाचणी बालासोरमध्ये करण्यात आली, तर रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी अहमदनगरमध्ये अर्जुन या मुख्य रणगाड्यावरून घेण्यात आली.

२४ सप्टेंबरला विमानातून रात्री डागत येणाºया पृथ्वी दोन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. ४०० किलोमीटरपर्यंत पृथ्वी दोनची मारक क्षमता आहे.

३० सप्टेंबरला जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी झाली, तर संपूर्ण देशी बनावटीच्या आयएनएस चेन्नई या विनाशिकेवरून १७ आॅक्टोबरला अरबी समुद्रात यशस्वी चाचणी झाली. यामुळे भारतीय नौदलाची शक्ती वाढली.

१ आॅक्टोबरला लेझर गायडेड रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.

३ आॅक्टोबरला शौर्य या क्षेपणास्त्राची चाचणी झाली. पाणबुडीमधून डागण्यात येणाºया सागरिका या ८०० किलोमीटरपर्यंत मारकक्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्राचे शौर्य हे जमिनीवरून मारा करणारे प्रारूप आहे.

५ आॅक्टोबरला लढाऊ जहाज नष्ट करण्याची क्षमता असलेल्या स्वनातीत अशा क्षेपणास्त्राची चाचणी झाली.

भारतीय बनावटीच्या पहिल्या किरणोत्सर्जनविरोधी म्हणजेच अ‍ॅन्टी रेडिएशन रुद्रम क्षेपणास्त्राची चाचणी ९ आॅक्टोबरला करण्यात आली.

१२ आॅक्टोबरला विमानातून समुद्रात डागण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी झाली. ओडिशामध्ये रणगाडाविरोधी अस्त्राची चाचणी करण्यात आली.

रणगाडाविरोधी नाग या क्षेपणास्त्राची चाचणी २२ आॅक्टोबरला पोखरणमध्ये करण्यात आली. बीएमपी रणगाड्यावरून नाग क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.

‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या पिनाक रॉकेटच्या सुधारित आवृत्तीची चाचणी ४ नोव्हेंबरला ओदिशा किनाऱ्यावरील चांदीपूर इथे यशस्वी उड्डाण चाचणी करण्यात आली. या रॉकेटचा आराखडा पुण्याच्या उच्च ऊर्जा पदार्थविज्ञान संशोधन संस्था आणि शस्त्र संशोधन विकास संस्था या दोन प्रयोगशाळांनी तयार केला आहे.

जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्यूआरएसएम या क्षेणास्त्राची चाचणी चांदीपूर केंद्रातून १३ नोव्हेंबरला करण्यात आली, तर क्यूआरएसएमची दुसरी चाचणी १७ नोव्हेंबरला करण्यात आली.

ब्राह्मोस या स्वनातीत क्षेपणास्त्राची जहाजभेदी क्षमता आजमावून बघण्यासाठी १ डिसेंबरला चाचणी करण्यात आली. भारतीय नौदलाने ही चाचणी घेतली आणि ती यशस्वी झाली. या क्षेपणास्त्राची समुद्रात जहाजांवर आणि जमिनीवरच्या लक्ष्यांवर मारा करायची अतुलनीय क्षमता, अनेक युद्धनीतींमध्ये त्याची भूमिका तसेच विविध मंचांवरून मारा करता येण्याची सोय भारतीय सशस्त्र दलाच्या तीनही दलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे.

Web Title: The sky is covered by DRDO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.