'बहिणाबाईंच्या पणतीला आकाश ठेंगणं', नऊवारीत 13 हजार फुटांवरून 'स्काय डायव्हिंग'!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 01:23 PM2018-02-12T13:23:02+5:302018-02-12T13:23:35+5:30
भारतीय स्कायडायव्हर शीतल महाजन हिने थायलंडमध्ये तब्बल 13 हजार फूट उंचीवरून विमानातून उडी घेऊन नवा विक्रम नोंदविला आहे.
पुणे : भारतीय स्कायडायव्हर शीतल महाजन हिने थायलंडमध्ये तब्बल 13 हजार फूट उंचीवरून विमानातून उडी घेऊन नवा विक्रम नोंदविला आहे. विशेष म्हणजे शीतल यांनी महाराष्ट्रीयन संस्कृतीचे प्रतिक असलेली नऊवारी साडी परिधान करून हा विक्रम केला. सोमवारी (12 फेब्रुवारी) सकाळी शीतलने हा विक्रम केला. रविवारीच हा विक्रम करण्याची पूर्ण तयारी शितलने केली होती. परंतु, खराब हवामानामुळे त्यांना 10 हजार फुटांवरूनच माघारी फिरावे लागले.
सोमवारी मात्र हवामानाने साथ दिल्याने हा विक्रम नोंदविणे शक्य झाले. पॅरा जम्पर ( स्काय डायव्हर) साहसी खेळात उत्तुंग भरारी घेत शीतल महाजन यांनी स्कायडायव्हिंग या साहसी खेळात आतापर्यंत 17 राष्ट्रीय व 6 जागतिक विक्रम केले आहेत. मराठी संस्कृतीचे जतन राहावे तसेच मराठी बाणा कायम राहावा याकरिता नऊवारी साडी परिधान करून त्यांनी विक्रम केला. शीतल महाजन यांचा जन्म पुण्यात झाला असून त्यांचे मूळ गाव जळगाव आहे. मूळची जळगाव असलेल्या शीतल या बहिणाबाई चौधरी यांची पणती आहे. बहिणाबाई चौधरीचे नातू कमलाकर महाजन यांची सुकन्या. बालपणापासूनच शीतल यांना काहीतरी नवे करण्याचा ध्यास होता.
यातच तिला पॅराशूट जम्पिगची आवड निर्माण झाली. शीतल महाजन यांनी आजपर्यंत 7000 हून अधिक वेळा पॅराशूट जम्प केल्या आहेत. त्यापैकी सर्वात जास्त 13,500 फुटावरून आणि त्यातील काही 18,000 फुटावरून व एक पॅराशूट जम्प ऑक्सिजनच्या सहाय्याने 30 हजार फुटांवरून केली आहे. सात विविध प्रकारांच्या विमानातून जगातील सातही खंडावर विविध ठिकाणांवर जसे की उत्तर ध्रुव (आर्क्टिक) आणि दक्षिण ध्रुव (अंटार्क्टिका) आणि भारत व फिनलॅन्ड, अमेरिका, स्पेन, ऑस्ट्रेलिया, युरोप, साऊथ आफ्रिका, साऊथ अमेरिका येथे पॅराशूट जम्प केलेल्या आहेत व रिझोना येथे दहा तासांचे व्हरटिकल विन्ड टनलमध्ये ट्रेनिंग घेतले आहे.