लोहगाव येथे स्लॅब कोसळून वाहनांचे नुकसान
By Admin | Published: May 13, 2017 04:51 AM2017-05-13T04:51:09+5:302017-05-13T04:51:09+5:30
लोहगाव येथे एका अनधिकृत इमारतीचा स्लॅब कोसळून त्याखाली असलेल्या दोन वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने यात जिवितहानी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोहगाव येथे एका अनधिकृत इमारतीचा स्लॅब कोसळून त्याखाली असलेल्या दोन वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने यात जिवितहानी झाली नाही. ही इमारत अनधिकृत असून न्यायालयाने बांधकामाला स्थगिती आदेश दिला असल्याची माहिती मिळाली.
लोहगाव येथे वडगाव शिंदे रस्त्यावर पोलीस चौकीच्या काही अंतरावर पुढे ही इमारत आहे. त्यात १३ सदनिका असून दोन मजल्यांचे स्लॅबचे बांधकाम झाले आहे. त्यातील एका सदनिकेवरची स्लॅब सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. त्याखाली दोन वाहने उभी होती. त्यांच्या छतावरच ही स्लॅब कोसळली.
सुदैवाने तिथे कोणीही उभे नव्हते. त्यामुळे जिवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांपैकी काहींनी इमारतीच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. न्यायालायाने बांधकामाला स्थागिती दिली होती. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम बंद होते. शुक्रवारी सायंकाळी जोरदार वारे सुटले होते, पावसाची शक्यता होती, त्याच्या माराने इमारतीचा स्लॅब कोसळला. नागरिकांनी त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.