पुण्यातील मोदीखाना येथे घराचा स्लॅब कोसळला; महिलेसह दोन चिमुकल्या जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 07:10 PM2021-07-02T19:10:26+5:302021-07-02T19:11:12+5:30
शंभर वर्षाहून अधिक जुन्या म्हाडीतील पहिल्या मजल्यावरील दहा बाय दहा खोलीचा स्लॅब कोसळला.
लष्कर - नवा मोदिखाना येथे संध्याकाळी ४ वाजेच्या दरम्यान ,जवळपास शंभर वर्षाहून अधिक जुन्या म्हाडीतील पहिल्या मजल्यावरील दहा बाय दहा खोलीचा स्लॅब कोसळला. त्यामध्ये एक महिलेसह सात वर्षाची मुलगी गंभीर जखमी तर इतर दोन लहान मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत .
नवा मोदिखाना परिसरात मॉडर्न मोटार ट्रेनिंग स्कूल शेजारी कुतुबुद्दीन काझी यांच्या मालकीची जुनी म्हाडी आहे. तळमजल्यावर चार तर पहिल्या मजल्यावर चार कुटुंब राहतात. त्यात आज दुपारच्या वेळेस श्रद्धा गायकवाड वय (२६) या आपल्या घरात तीन लहान मुलींची शिकवणी घेत होत्या.
अचानक घराचा स्लॅब कोसळल्याने या सर्व दहा फूट खाली अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घरात स्लॅब सह पडल्या. यात गायकवाड यांच्या डोक्याला, कंबर, हात, व पायाला गंभीर दुखापत झाली असून त्या धन्वंतरी हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेत आहेत, तर ६ वर्षाची लहान मुलगी नक्षत्रा कांबळे(७) हिला देखील खांदा, कपाळ व पायाला गंभीर इजा झाली तर स्वरा भोसले (७) या लहान मुलीला देखील किरकोळ दुखापत होऊन हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर पटेल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात झालेल्या ठिकाणी तात्काळ कॅन्टोन्मेंट बोर्डाची अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली , स्थानिक लष्कर पोलीस देखील दाखल झाले असून पंचनाम्याचे काम सुरू आहे.