डल्ला मारण्याआधी व्हा, सावध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2016 01:02 AM2016-04-22T01:02:58+5:302016-04-22T01:02:58+5:30
गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सोनसाखळी चोरी, चाकूचा धाक दाखवून लुटणे या चोरीच्या घटनांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे
पिंपरी : गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सोनसाखळी चोरी, चाकूचा धाक दाखवून लुटणे या चोरीच्या घटनांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तर नागरिकांना घर बंद करून बाहेरगावी जाणेही धोकादायक वाटू लागले आहे. कारण, बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर असून, गेल्या तीन महिन्यांत दिवसा व रात्री मिळून ८४ घरफोडीच्या घटना घडल्या. यामध्ये फक्त १२ घटनाच उघडकीस आल्या असून, चोरटे अद्यापही मोकाटच आहेत.
सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागल्या असून, बहुतांश कुटुंबे बाहेरगावी फिरायला-नातेवाइकांकडे जाण्याचे नियोजन करीत आहे. याचा फायदा चोरटे घेत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून तर घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घर दिसल्यावर चोरटे लागलीच कडी-कोयंडा उचकटून लाखोंचा मुद्देमाल लंपास करीत आहेत.
परिमंडल तीनच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड, एमआयडीसी, चतु:शृंगी, हिंजवडी, सांगवी, वाकड या ठिकाणी गेल्या तीन महिन्यांत ८४ घरफोडीच्या घटना घडल्या.
यामध्ये दिवसा ३२ घरफोडीच्या घटना घडल्या असून, यात सर्वाधिक घरफोड्या सांगवी आणि वाकडमध्ये ६ ठिकाणी, तर भोसरीत ५ ठिकाणी घरफोड्या झाल्या.
तसेच इतर पोलीस ठाण्यांमध्येही दिवसा घरफोडीच्या घटनांची नोंद असून, ३२ घरफोडीच्या घटनांपैकी फक्त दोनच घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
५२ ठिकाणी रात्रीच्या घरफोड्या झाल्या असून, यामध्ये सर्वाधिक १४ घरफोड्या निगडीत झाल्या.
या १४ पैकी दोनच घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, रात्रीच्या एकूण ५२ घरफोडीच्या घटनांपैकी फक्त १० घटनांचा छडा पोलिसांनी लावला आहे.
(प्रतिनिधी)
नागरिकांचीही उदासीनता
गेल्या तीन महिन्यांपूर्वी पिंपरीतील अजमेरा कॉलनी, तळवडे, निगडी या ठिकाणी दिवसा घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर तेथील सोसायट्यांमधील नागरिक किती जागरूक झाले. याची पाहणी करण्यासाठी ‘लोकमत टीम’ने त्या ठिकाणी दिवसा स्टिंग आॅपरेशन केले होते.
ज्या सोसायटीत घरफोडी झाली होती त्या ठिकाणी प्रतिनिधी हातात लोखंडी हातोडी घेऊन फिरले. एका ठिकाणी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे भासवले. सोसायटीत फिरताना परिसरातील नागरिक फक्त बघत होते. मात्र, कोणीही हटकले नाही आणि विचारपूसही केली नाही. यावरून सुरक्षितेबद्दल नागरिकांची उदासीनता दिसून आली.