मस्त झोपा सहा-आठ तास नाहीतर ‘हा’ होईल त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:10 AM2021-03-19T04:10:15+5:302021-03-19T04:10:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सकस आहार, योग्य व्यायाम आणि पुरेशी झोप ही उत्तम आरोग्याची त्रिसूत्री मानली जाते. सध्याच्या ...

Sleep well for six or eight hours or else it will be a hassle | मस्त झोपा सहा-आठ तास नाहीतर ‘हा’ होईल त्रास

मस्त झोपा सहा-आठ तास नाहीतर ‘हा’ होईल त्रास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सकस आहार, योग्य व्यायाम आणि पुरेशी झोप ही उत्तम आरोग्याची त्रिसूत्री मानली जाते. सध्याच्या काळात कामाच्या बदललेल्या वेळा, गॅझेट्समध्ये वाया जाणारा वेळ, कमालीचा शारीरिक आणि मानसिक ताण यामुळे बहुतांश लोकांच्या आहार, व्यायाम आणि झोपेवर विपरित परिणाम झालेला दिसतो. अपुरी झोप अनेक आजारांना आमंत्रण देते. त्यामुळे झोपण्याच्या किमान दोन तास आधी जेवावे, अर्धा तास आधी फोन, टीव्हीपासून दूर राहावे आणि सकारात्मक विचार करावा असा सल्ला ‘जागतिक झोप दिना’च्या डॉक्टरांनी दिला आहे.

दर वर्षी ‘जागतिक निद्रा दिन’ १९ मार्च रोजी साजरा केला जातो. या वर्षीच्या दिवसाचे घोषवाक्य ‘नियमित झोप, निरोगी भविष्य’ असे आहे. आयुष्यभर झोपेचा दर्जा उत्तम असेल तर भविष्यात अनेक आजारांपासून दूर राहता येते, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला आहे. सकाळी गजराशिवाय जाग आली, अगदी ताजेतवाने वाटले आणि पुन्हा झोपण्याची इच्छा झाली नाही तर समजावे की रात्रीची झोप चांगली व पुरेशी झाली आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

डॉ. कविता चौधरी म्हणाल्या, “अपूर्ण झोपेमुळे ॲसिडिटी, डोकेदुखी आणि चिडचिडेपणा असा त्रास होतो. अपुऱ्या झोपेमुळे कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. विस्कळीत झोपेचा आपल्या दैनंदिन जीवनातील कामगिरीवर प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षपणे कौटुंबिक जीवनावर, नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होत असतो. म्हणूनच झोपेचा विकार ही गंभीर सामाजिक समस्या होऊन बसली आहे.” झोप वरचेवर खालावत गेली तर निद्रा दोष व्हायला वेळ लागत नाही. निद्रानाश, स्लीप ॲपनिया, झोपेत चालणे, झोपेत बोलणे, अतिझोपाळूपणा, रेस्टलेस लेग सिंड्रोम असे बरेचसे निद्रादोषाचे प्रकार असतात, असे तज्ज्ञ सांगतात.

चौकट

निद्रानाशावर उपचार

-झोपण्याच्या वेळेच्या कमीत कमी तासभर आधी तरी सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बंद करावेत. यामुळे उत्तेजित झालेला मेंदू शांत होऊन ‘स्लीप मोड’मध्ये जाण्याची पूर्वतयारी करतो.

-झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ पूर्व निश्चित असावी. लहान मुलांसाठी झोपण्याची वेळ रात्री दहापेक्षा उशिरा नसावी.

-वामकुक्षीची सवय असेल तर ती अर्ध्या तासापेक्षा जास्त नसावी.

झोपण्याच्या चार तास आधी मद्यपान, धूम्रपान, चहा, कॉफी सेवन टाळावे.

-व्यायाम नियमितपणे करावा; पण झोपण्यापूर्वी दोन तास व्यायाम टाळावा.

-झोपण्यासाठी आरामदायी बिछाना हवा. घरातले तापमान आरामदायी असावे.

-झोपण्याच्या खोलीत विचलित करणारे आवाज व प्रकाश शक्य तितके कमी येतील असा प्रयत्न करा.

-बिछाना फक्त झोप आणि समागम एवढ्याचसाठी असावा. कार्यालयीन कामासाठी किंवा ‘टीव्ही रुम’ म्हणून त्याचा वापर होऊ नये.

-शरीरातील जैविक घड्याळ सूर्यप्रकाशावर अवलंबून असते. त्याचा समतोल सांभाळा.

-झोपण्यापूर्वी डोळे मिटून शांतपणे प्रार्थना करा. मनातील राग, लोभ , मत्सर, द्वेष सर्व नाकारात्मक भावनांना वाट करून द्या.

Web Title: Sleep well for six or eight hours or else it will be a hassle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.