भेडणीकरांच्या घशाला उन्हाळ्याआधीच कोरड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 12:29 AM2018-12-27T00:29:24+5:302018-12-27T00:29:48+5:30
राज्यातील सर्वांत मोठे उजनी धरण तालुक्यात असतानाही त्याच इंदापूर तालुक्यातील भेडणी गावकऱ्यांना उन्हाळ्याच्या आधीच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
काटी : राज्यातील सर्वांत मोठे उजनी धरण तालुक्यात असतानाही त्याच इंदापूर तालुक्यातील भेडणी गावकऱ्यांना उन्हाळ्याच्या आधीच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावाचा जलस्रोत असणारी विहीर कोरडी पडल्याने भेडणीकरांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे शेजारी असलेल्या शेटफळ तलावाचे पाणी गावातील विहिरीत सोडावे, अशी मागणी सरपंच अनिल चव्हाण यांनी केली.
भेडणीमध्ये सध्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना लांबपर्यंत पायपीट करावी लागत आहे. एक हंडा पाण्यासाठी गावातील पंपहाऊसवर महिलांना, तसेच नागरिकांना रांगेत उभे राहून उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत.
अनेक बाया-बापड्या पंपहाऊसपासून घरापर्यंत डोक्यावर व कंबरेवर हंडा घेऊन हेलपाटे मारत आहेत, तर ज्यांचे कुटुंब मोठे आहे, त्या घरातील गडीमाणसेही इतर व्यवसाय सोडून मोटारसायकलवर ड्रम लावून पंपहाऊसला पाण्यासाठी हेलपाटे मारत आहेत.
उन्हाळा संपायच्याआधीच गावातील विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे उन्हाळ््यामध्ये या गावातील पाणीटंचाई गंभीर होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
...तत्काळ उपाययोजना करणार
भेडणी गावांचा पाणी सोडण्यासंदर्भात प्रस्ताव दाखल झाला आहे. शेटफळ हवेलीचे गावकामगार तलाठी यांना सध्याच्या परिस्थितीची पाहणी करून अहवाल तत्काळ कार्यालयात सादर करण्याचा आदेश दिला आहे. भेडणी गावातील नागरिकांचे हाल होऊ देणार नाहीत. त्यांच्यासाठी तत्काळ उपाययोजना करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे इंदापूर तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
उन्हाळ््यातील भीषण टंचाई लक्षात घेता त्या वेळी पाणीपुरवठा कुठून करावा, याबाबतचे नियोजन आताच करावे, शिवाय तूर्तास गावामध्ये टँकर सुरू करावा, अशी मागणी सरपंच चव्हाण यांनी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे केली आहे.