दुकान खाली करण्यासाठी टाकला जातोय उतारा; काळ्या जादूचं कृत्य सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 09:25 AM2019-12-19T09:25:22+5:302019-12-19T09:34:05+5:30
नवस फेडण्यासाठी, आपल्यावरील अरिष्ट दूर व्हावे म्हणून देवाच्या नावाने उतारा टाकण्याचा प्रकार पूर्वीपासून चालत आला आहे.
पुणे : नवस फेडण्यासाठी, आपल्यावरील अरिष्ट दूर व्हावे म्हणून देवाच्या नावाने उतारा टाकण्याचा प्रकार पूर्वीपासून चालत आला आहे. ही अंधश्रद्धा असली तर अजूनही समाजात त्याविषयी भीती पसरलेली आहे. त्यामुळे असा काही उतारा दिसला तर त्यापासून लांब राहण्याचा प्रकार अजूनही शहरात दिसून येत आहे. लोकांच्या मनातील या अंधश्रद्धेचा गैरफायदा दुकाने, घरे खाली करून घेण्यासाठी केला जाऊ लागला आहे. त्याचा प्रत्यय गोखलेनगरमध्ये असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. शिवसेनेच्या गोखलेनगर शाखेने उभारलेल्या सीसीटीव्हीमधून हा प्रकार उजेडात आला आहे.
शिवसेनेच्या गोखलेनगर शाखेतर्फे मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. वेताळबाबा चौक, कुसाळकर पुतळा, अरुण कदम चौक येथील दुकाने, घराबाहेर नारळ, लिंबू व त्याला टोचलेल्या सुया असा उतारा टाकलेला आढळून आला होता. याबाबत शिवसेनेचे शिवाजीनगर मतदारसंघाचे प्रमुख उमेश वाघ आणि उपविभाग प्रमुख प्रकाश धामणे यांनी माहिती दिली. गोखलेनगर शिवसेना शाखेच्या वतीने शाखेसमोर व मैदानात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्याचे चित्रीकरण शाखेमध्ये ठेवण्यात आले आहेत. शाखेसमोरच्या घरमालकाने आमच्या दुकानाबाहेर कोणीतरी उतारा ठेवल्याचे सांगितले. त्यावरून आम्ही सीसीटीव्हीतील चित्रीकरण तपासले. तेव्हा एका दाम्पत्य दुचाकीवरून पहाटेच्या सुमारास त्यातील पुरुष खाली उतरून दुकानाच्या दरवाजात काही वस्तू ठेवतो व त्यानंतर दोघेही तेथून निघून जाताना दिसले. हे चित्रीकरण घरमालकाने पाहिल्यावर त्यातील व्यक्ती पहाटेच्या अंधारात काहीशी अस्पष्ट दिसत होती. तरीही त्यांनी त्याला ओळखले.
गेल्या दिवाळीपासून ती व्यक्ती आपल्याकडे दुकान भाड्याने मागत असल्याचे घरमालकांनी सांगितले. दरवाजात लिंबू, त्याला टोचलेल्या सुया असा उतारा मिळाल्यावर लोक आपल्यामागे झंझट नको, म्हणून दुकान सोडून जातील असा त्यामागे होरा असल्याचे उमेश वाघ यांनी सांगितले. असे प्रकार यापूर्वी गोखलेनगर, जनवाडी परिसरात घडलेले आढळून आले आहेत. या भागात मुख्य रोडवर सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी आम्ही यापूर्वी केली होती. पण त्याची लिंक कोठे द्यावी, असा प्रश्न असल्याने शासनाकडे ही मागणी पडून आले. त्यानंतर शिवसेनेने स्वत: हे कॅमेरे बसविल्याने हा प्रकार पुढे येऊ शकला. घरे, दुकाने खाली करवून घेण्यासाठी अशा प्रकारे अंधश्रद्धा पसविण्याचे काम काही जण करीत असून लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वाघ यांनी केले आहे.