सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक संथ गतीने; नागरिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 02:00 PM2022-06-04T14:00:02+5:302022-06-04T14:05:01+5:30

राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे...

slow traffic due to flyover work on sinhagad road Civil harassment pune latest news | सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक संथ गतीने; नागरिक हैराण

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक संथ गतीने; नागरिक हैराण

Next

- कल्याणराव आवताडे

धायरी: सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. यासाठी पुलाचे खांब बांधण्याचे काम सुरू आहे; परंतु दळणवळणासाठी एकमेव असलेल्या सिंहगड रस्त्याला महापालिकेने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करणे आवश्यक असताना उड्डाण पुलाचे काम हाती घेतल्याने या रस्त्यावर वाहतूक संथ गतीने सुरू असून, काही वेळा वाहतूक कोंडीसुद्धा होत आहे.

सिंहगड रस्ता तसा आधीच गजबजलेला असल्याने शिवाय नऱ्हे, धायरी, नांदेड गाव, किरकटवाडी, खडकवासला अन्य भागातील राहणाऱ्या नागरिकांना मुख्य रस्त्याने जावे लागत आहे; मात्र पर्यायी रस्ता नसल्याने त्यांना दररोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सध्या पर्यायी रस्ता म्हणून माणिकबाग ते हिंगणे येथील विश्रांतीनगरपर्यंत साडेसात मीटरचा पर्यायी रस्ता खुला असून, येथून वाहतूक सुरू आहे, तसेच विश्रांतीनगर ते पु. ल. देशपांडे उद्यानपर्यंतचा रस्ता बनविण्यात आला असून, तेथून पुढे एका पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे जनता वसाहतपर्यंतचा अवघा ६०० मीटरच्या रस्त्याचे काम रखडले आहे. अशातच नव्याने बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.

मुख्य सिंहगड रस्त्यावर उड्डाण पुलाचे काम सुरू असले तरी हे काम चालू असताना महापालिका आणि पोलीस यंत्रणा यांनी एकत्रित काम करणे अपेक्षित होते; मात्र तसे चित्र जागेवर दिसत नाही. सिंहगड रस्त्यावर दुकानांसमोर भाजी विक्रेते बसत असल्याने तेथेच दुचाकी व चारचाकी लावल्या जातात. त्यातच पुलाचे काम सुरू, त्यामुळे उर्वरित जागेतून सर्व वाहतूक सुरू असते. याचा परिणाम म्हणून येथील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे...

१. मुख्य सिंहगड रस्त्यावर पुलाचे काम होईपर्यंत '' नो पार्किंग झोन '' करणे

२. वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे

३. भाजी विक्रेत्यांचे तात्पुरते स्थलांतर करणे

४. पर्यायी रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावणे

५. सकाळी व संध्याकाळच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता सिग्नलची वेळ वाढविणे

......असेही पर्यायी रस्ते होऊ शकतात

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सनसिटी ते कोथरूड उड्डाणपूल व वडगांव ते मित्रमंडळ चौकापर्यंत पर्यायी रस्ता होऊ शकतो, शिवाय राजाराम पुलाजवळील नदीबाजूने थेट खडकवासल्यापर्यंत हा पर्यायी मार्ग म्हणून होऊ शकतो, हे तीन पर्यायी मार्ग सुरू झाल्यास मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहनांसाठी रस्ता कमी पडत आहे. महापालिकेकडे पाठपुरावा करून फुटपाथ काढलेले आहेत. त्यामुळे रस्ता थोडा मोठा करण्यात आला आहे. सध्या वाहतूक कोंडी होत नाही; मात्र वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

- उदयसिंह शिंगाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रस्ता वाहतूक विभाग.

Web Title: slow traffic due to flyover work on sinhagad road Civil harassment pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.