तांत्रिक समस्यांमुळे मतदार पडताळणी संथ; दोन आठवड्यांनी मुदत वाढवून द्या, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची मागणी
By नितीन चौधरी | Published: August 22, 2023 03:25 PM2023-08-22T15:25:39+5:302023-08-22T15:25:54+5:30
राज्यात आतापर्यंत ९ कोटी ४ लाख ६५ हजार ३०५ मतदारांपैकी केवळ ८६ लाख ३४ हजार ३९९ मतदारांची पडताळणी होऊ शकली
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राज्यात २१ जुलैपासून मतदार पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी आयोगाकडून दिलेल्या ॲपमध्ये निर्माण हाेत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे आतापर्यंत केवळ साडेनऊ टक्के अर्थात ८६ लाख ३४ हजार मतदारांचीच पडताळणी होऊ शकली. चार दिवसांपूर्वी यातील तांत्रिक समस्या दूर झाल्याने या पडताळणीला आता वेग आला आहे; मात्र पडताळणीची मुदत सोमवारी (दि. २१) संपल्याने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पडताळणीची ही मुदत आणखी दोन आठवडे वाढवून मिळावी, अशी विनंती आयोगाला केली आहे.
राज्यात महिनाभरापासून मतदार पडताळणीची मोहीम सुरू आहे. त्यात नवमतदारांची नोंद, मृत मतदारांचे नाव कमी करणे, नवे फोटो टाकणे, पत्ता नूतनीकरण करणे अशी कामे करण्यात येत आहेत. या मोहिमेची अंतिम मुदत सोमवारपर्यंत होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने नव्याने उपलब्ध करून दिलेल्या बीएलओ अर्थात, बुथ लेवल ऑफिसर या ॲपमध्ये अनेक तांत्रिक समस्या जाणवत आहेत. यामध्ये सर्व माहिती केवळ ऑनलाइन अपलोड होत असल्याने, बुथस्तरीय अधिकाऱ्यांना मतदारांची पडताळणी करण्यात अनेक अडचणी येत आहेत.
याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान टीमसोबत वारंवार पत्रव्यवहार केला. त्यानुसार, या समस्या काही प्रमाणातच सुटल्या. अखेर चार दिवसांपूर्वी या ॲपमधून ऑफलाइन माहिती अपलोड करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर, या मोहिमेने वेग धरला. पूर्वीच्या ‘गरुडा ॲप’मध्ये ही कामे ऑफलाइनही होत होती. मात्र, आताच्या ॲपमध्ये ही माहिती ऑनलाइनच अपलाेड हाेत असल्याने पडताळणीत अडथळे हाेत आहेत.
ऑफलाइन अर्जही प्रलंबित
राज्यात आतापर्यंत ९ कोटी ४ लाख ६५ हजार ३०५ मतदारांपैकी केवळ ८६ लाख ३४ हजार ३९९ मतदारांची पडताळणी होऊ शकली आहे, तर ८ कोटी १८ लाख ३० हजार ९०६ मतदारांची पडताळणी अद्याप झालेली नाही. एकूण मतदार संख्येच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ९.५४ टक्केच आहे, तसेच बीएलओ ॲपपूर्वी ईआरओ नेट १ या प्रणालीवरून ऑफलाइन आलेले अर्ज संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत होते. मात्र, नव्याने उपलब्ध करून दिलेल्या ईआरओ नेट २ या प्रणालीतही तांत्रिक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे नवमतदारांनी, तसेच मतदार कार्ड दुरुस्तीसाठी आलेल्या राज्यभरातील सुमारे ६ लाख १३ हजार ४४६ अर्जांपैकी आतापर्यंत केवळ २ लाख ९१ हजार ३८२ अर्जांचीच माहिती अपलोड होऊ शकली आहे.
जिल्हानिहाय पडताळणी (टक्क्यांत)
ठाणे १.२०, नंदूरबार १.२२, पालघर १.२२, पुणे १.६५, मुंबई शहर १.७६, रायगड २.५३, उस्मानाबाद ३.४७, नागपूर ३.७१, धुळे ३.९५, चंद्रपूर ४.४६, भंडारा ५.१६, नांदेड ५.३१, बीड ५.३१, मुंबई उपनगर ५.५९, बुलढाणा ६.५८, जळगाव ६.९२, संभाजीनगर ७.६३, गडचिरोली ७.६९, सिंधुदुर्ग ८.६८, गोंदिया ८.७०, अकोला ९.२५, रत्नागिरी ९.४०, सांगली १०.३०, नगर १०.३१, अमरावती १२.८३, नाशिक १३.२८, सातारा १५.०२, जालना १८.९४, हिंगोली १९.८९, सोलापूर २०.२८, लातूर २२.०६, यवतमाळ २२.७४, परभणी २४.२०, कोल्हापूर २४.९८, वाशिम ४१.१७, वर्धा ५३.३६, राज्य ९.५४.
''बुथस्तरीय अधिकारी आपले मूळ काम सांभाळून नव्याने उपलब्ध करून दिलेल्या ॲपमध्ये मतदारांची पडताळणी करत आहेत. हे काम केवळ शनिवारी व रविवारी होत असल्याने पडताळणीसाठी आणखी दोन आठवड्यांचा कालावधी वाढवून मागितला आहे. - श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र.''