मंचरमध्ये छोट्या व्यवसायिकामुळे वाहतुकीला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:08 AM2020-12-07T04:08:02+5:302020-12-07T04:08:02+5:30
मंचर: शहरातील घोडेगाव रस्त्यावर दुतर्फा बसणाऱ्या छोट्या व्यावसायिकामुळे वाहतूकीला अडथळा होत आहे. विशेषता रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी रस्त्याच्या दोन्ही ...
मंचर: शहरातील घोडेगाव रस्त्यावर दुतर्फा बसणाऱ्या छोट्या व्यावसायिकामुळे वाहतूकीला अडथळा होत आहे. विशेषता रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोटे व्यावसायिक त्यांची दुकाने थाटत असून त्यामुळे वाहतूक वारंवार खोळंबते. दरम्यान, या छोट्या व्यावसायिकांची इतरत्र व्यवस्था करुन वाहतूककोंडी सोडवावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
मंचर शहरातून जाणारा घोडेगाव रस्ता हा नेहमीच गजबजलेला असतो. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी हा रस्ता महत्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते खडीर्नाला यादरम्यान रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण झाले आहे. हे काम होताना रस्त्याची खोली वाढली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला उंच भाग झाल्याने रस्ता अजून अरुंद झाला आहे. आठवड्यातील इतर दिवशी रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असते.अनेकवेळा रस्त्यालगत वाहने उभी करून वाहनचालक निघून जातात.त्यावेळीही वाहतूक कोंडीचा अनुभव येतो.
रविवार हा मंचर शहराचा आठवडे बाजाराचा दिवस आहे. या दिवशी तालुक्याच्या इतर गावातून शेतकरी त्यांचा शेतमाल विक्रीसाठी तसेच नागरिक बाजारात खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात.त्यामुळे हा परिसर गर्दीने गजबजलेला असतो. अशात छोटे व्यावसायिक रस्त्यालगत त्यांची दुकाने थाटून रस्त्याच्या दुतर्फा ओळीने हे दुकानदार बसलेले असतात. दुकानासमोर छत्री लावली जाते. अथवा सावलीसाठी निवारा केला जात असल्याने मोठी जागा व्यापली जाते. त्यामुळे वाहनांना जाण्यासाठी पुरेसा रस्ता राहत नाही. उर्वरित रस्त्यावरून वाहने तसेच पादचारी एकाचवेळी जात असल्याने वाहतूक संथगतीने सुरू राहते व वाहतुकीला अडथळा येतो. रविवारी अनेकवेळा येथे वाहतूक कोंडी झालेली आढळते. वाहतूक पोलीस यावेळी रस्त्यावर नसतात. त्यामुळे अनेकवेळा वाहनचालकांना ताटकळत थांबावे लागते. दिवसभर हा बाजार सुरू असतो. त्यामुळे वाहनचालकांना अक्षरशा कसरत करत प्रवास करावा लागतो. श्री क्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. घोडेगाव रस्त्यालगत दोन्ही बाजूला बसणाऱ्या व्यावसायिकांना पर्यायी जागा नेमून देण्यात यावी व हा रस्ता पूर्णपणे मोकळा ठेवण्यात यावा अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
फोटो
०६मंचर
मंचर शहरातील घोडेगाव रस्त्यालगत दुतर्फा दुकाने थाटण्यात आल्याने वाहतूक कोंडी होते.