पुण्यातले लहान व्यवसाय बुडाले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:11 AM2021-04-17T04:11:42+5:302021-04-17T04:11:42+5:30
- शिवानी खोरगडे पुणे : केटरिंग, मंडप, साउंड, लाइट, इव्हेंट्स असा कोणत्याही व्यवसाय बघितला तर त्यातही लहान-लहान व्यवसाय करणारे ...
- शिवानी खोरगडे
पुणे : केटरिंग, मंडप, साउंड, लाइट, इव्हेंट्स असा कोणत्याही व्यवसाय बघितला तर त्यातही लहान-लहान व्यवसाय करणारे एकत्र असतात. हे लहान व्यवसाय एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे एकाचं जरी काम बंद पडलं तरी अख्खी चेनच विस्कळीत होते. सध्या मजूर रस्त्यावर आले आहेत आणि मजुरांच्या हाताला काम देणारेही त्याच मार्गावर आहेत, अशी सगळी परिस्थिती आहे.
केटरिंग व्यवसायासाठी पुण्यात आज लाखोंच्या संख्येने मजूर आहेत. पण यांचा विचार करता सरकारने जे नियम देणे अपेक्षित होते ते दिले नाहीत. जेव्हा कोरोनामुळे एखाद्या समारंभात केवळ ५० लोक असावे असे सरकारने आखून दिले आहे. तेव्हा हा विचार करण्यात आला नाही की जर जागा मोठी असेल तर जास्त लोकांची सुटसुटीत व्यवस्था करता येऊ शकते. कोरोनाचं भान आम्हालाही आहे. आमचे धंदे बंद पडले, आम्ही कोरोना स्वतःला लावून घेणार नाही. पण आहे त्या स्थितीत आम्हाला कडक नियमावलीतही काम करता येऊ शकतं. पण सरकारने आमच्या मागण्यांना कचऱ्याची टोपली दाखवली आहे.
- संतोष माकोडे, केटरर्स
सिजन म्हटला की आमच्याकडे एकाकडे रोज अडीचशे ते तीनशे लोक काम करणारी असतात. निदान पन्नास टक्के क्षमता तरी द्यावी. आज कार्यालय, लॉन्सची जागा म्हणजे गुंठ्यांमध्ये असते. सगळी पद्धतशीर व्यवस्था होऊ शकते. पुणे स्टेशन, शिवाजीनगर अशा जागी जे मजूर आता दिसत आहेत त्यांच्यासाठी आम्हीही प्रयत्न केले, पण कामच बंद पडल्याने त्यांच्यावर अशी वेळ आलीये.
- विजय मिश्रा, केटरर्स
सध्याच्या इव्हेंट इंडस्ट्रीच्या बंद होण्यावर लवकर उपाययोजना सरकारनं करावी. गेलं वर्ष आणि आतासुद्धा आम्ही होईल तेवढे मजूर जगवतोय. पण आम्हालाही आता मर्यादा आल्या आहेत. सोनं विकून, घरातील बचत मोडून मजुरांचा खर्च आणि बँकेचे हफ्ते यातच आमचे दिवस चालले आहेत. ही इंडस्ट्री आता उरलेलीच नाही, असं वाटायला लागलंय.
- अण्णा कुदळे, केटरर्स