छोट्या विक्रेत्यांना हवी व्यवसायाला जागा

By admin | Published: December 22, 2016 02:10 AM2016-12-22T02:10:35+5:302016-12-22T02:10:35+5:30

कधी हॉकर्स झोनमध्ये कायमची जागा देणार असे सांगितले जाते, तर कधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले जाते.

Small businesses want space for business | छोट्या विक्रेत्यांना हवी व्यवसायाला जागा

छोट्या विक्रेत्यांना हवी व्यवसायाला जागा

Next

पिंपरी : कधी हॉकर्स झोनमध्ये कायमची जागा देणार असे सांगितले जाते, तर कधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले जाते. महापालिकेचा कोणत्या क्षणी काय निर्णय होईल, हे सांगता येत नाही. महापालिकेने व्यवसायासाठी दिलेली जागा कायमस्वरूपी ताब्यात राहील, याची शाश्वती नसल्याने रस्त्यावर कपडे विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना योग्य प्रकारे व्यवसाय करता येत नाही. कारवाईच्या भीतीपोटी माल भरला जात नाही. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते.
पिंपरी : शहरात पिंपरीतून इंदिरा गांधी उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीमाभिंतीला लागून अनेक नेपाळी बांधव स्वेटर, लोकरीचे कपडे विक्री करीत होते. त्यांचा व्यवसायात जम बसला होता. नेपाळी बांधवांबरोबर अन्य लोकही या व्यवसायात आहेत. १५ वर्षांपासून ज्या ठिकाणी व्यवसायाचा जम बसला होता. तेथून त्यांना स्थलांतरित करण्यात आले. मोरवाडीकडून इंदिरा गांधी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत महापालिकेच्या विकास आराखड्यात पीएमपी बसथांब्यासाठी आरक्षित ठेवली जागा आहे. त्या जागेच्या समोर मोकळ्या जागेत या व्यावसायिकांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले. फॅशन स्ट्रीट असे नाव देऊन त्यांची तेथे तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. व्यावसायिकांनी त्या ठिकाणी पत्र्याची शेड उभारून व्यवसाय सुरू केला. दोन-तीन वर्षे तेथे व्यवसायाला होताच, तेथून त्यांचे स्थलांतर बसथांब्याच्या आरक्षित जागेवर करण्यात आले. तेथे जाऊन आठ वर्षांचा कालावधी लोटला आहे. पूर्वीसारखा व्यवसाय होत नाही. त्यांच्या पूर्वीच्या जागेवर दुसरे व्यावसायिक दाखल झाले आहेत. महापालिकेने ज्या उद्देशाने या व्यावसायिकांना तेथून स्थलांतरित केले, तो उद्देश सफल झाला नाही. त्या व्यावसायिकांच्या जागेवर दुसरे आल्याने परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.
स्थलांतराचा नेमका उद्देश काय?
रस्त्यालगतच्या सीमाभिंतीजवळ वर्षानुवर्षे कपडे विक्री व्यवसाय करणाऱ्यांचे स्थलांतर केले. त्या ठिकाणी दुसऱ्या व्यावसायिकांचे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता महापालिकेने घेणे आवश्यक होते. मात्र, जुन्या व्यावसायिकांच्या जागेवर दुसरे व्यावसायिक दाखल झाले आहेत.
असे असेल, तर महापालिकेचा पूर्वीच्या व्यावसायिकांना त्या जागेवरून स्थलांतरित करण्याचा नेमका उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्या ठिकाणी स्थलांतर केले, ती जागासुद्धा कायमस्वरूपी राहील की नाही, याबद्दल महापालिकेकडून स्पष्ट केले जात नाही. त्यामुळे व्यावसायिक संभ्रमात आहेत.
सर्वेक्षण झाले; पुढील कार्यवाही कधी ?
महापालिकेने फॅशन स्ट्रीटसाठी जागा उपलब्ध करून देऊन ८३ व्यावसायिकांचे स्थलांतर केले आहे. त्यांची माहिती घेतली. अर्ज भरून घेतले. हॉकर्स झोनसाठी पात्र, अपात्र यादी निश्चित केली परंतु पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. हॉकर्स झोनमध्ये जागा देणार की आहे त्याच जागेवर व्यवस्था करणार याबाबतची महापालिकेकडे कोणतीच स्पष्टता नाही. येथील व्यावसायिक जागा निश्चित कधी होणार या आशेवर आहेत. -प्रमोद यादव
भीतीची टांगती तलवार दूर व्हावी
छोट्या व्यावसायिकांबद्दलचे धोरण महापालिकेने निश्चित करावे. जोपर्यंत हे धोरण निश्चित होत नाही, तोपर्यंत व्यावसायिक भीतीच्या छायेखाली आहेत. महापालिकेच्या सततच्या कारवाईमुळे त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. प्रचंड नुकसान सहन करीत हे व्यावसायिक महापालिकेने दिलेल्या जागेवर तग धरून आहेत. ही जागा कायमस्वरुपी नाही. तात्पुरत्या स्वरुपात असल्याने त्या ठिकाणी कायमस्वरुपी असे शेड बांधता येत नाही. विकास करताना मर्यादा येतात. आणखी किती दिवस असे काढणार, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.
भीतीपोटी कोणीही माल भरत नाही
महापालिकेच्या वतीने वारंवार स्थलांतर होते. कधीही असा निर्णय होऊ शकतो, ही भीती कायम मनात असल्याने पूर्ण क्षमतेने व्यवसाय करता येत नाही. महापालिकेकडून व्यावसायिकांना दिलेली जागा त्यांच्या ताब्यात कायम राहील, याची शाश्वती उरलेली नाही. महापालिकेला भाडे देण्याची तयारी आहे; परंतु महापालिका भाडे स्वीकारत नाही. महापालिकेचे नेमके धोरण काय, कसे समजायचे, असा प्रश्न व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे.- अश्पाक सिद्दिकी

तुळशीबागेसारखी बाजारपेठ होईल

एकाच ठिकाणी छोट्या व्यावसायिकांना जागा दिली तर पुण्यातील तुळशीबाग कॉलनीच्या धर्तीवर बाजारपेठ तयार होऊ शकेल. सध्या जागेचा ताबा किती दिवस राहील याची शाश्वती नसल्याने कोणी अधिक माल भरत नाही. वैविध्यपूर्ण माल भरण्याची इच्छा असूनही गुंतवणूक करण्यास कोणी धजावत नाही. एकाच प्रकारचे कपडे असल्याने ग्राहकही या ठिकाणी येत नाहीत. - रामदरस यादव

बसथांब्याला विरोध नाही
महापालिकेने छोट्या व्यवसायिकांना उपलब्ध करून दिलेली जागा पीएमपी बसथांब्यासाठीची आरक्षित जागा आहे. या ठिकाणी बसथांबा सुरू करावा, उर्वरित जागा या व्यावसायिकांना द्यावी. बसथांबा सुरू करण्यास व्यावसायिकांची हरकत नाही. बसथांबा झाल्यास व्यावसायिकांच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. बसथांबा झाल्यास या ठिकाणी प्रवाशांची वर्दळ वाढेल त्याचा फायदा निश्चितच व्यावसायिकांना होईल. या जागेबाबत महापालिकेने ठोस निर्णय घ्यावा. -इफ्राक खान

Web Title: Small businesses want space for business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.