बारामतीत छोट्या बालकाचा 'अचाट प्रताप' ; खेळता खेळता गिळले दोन रुपयांचे नाणे..
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 01:58 PM2020-10-01T13:58:54+5:302020-10-01T14:01:40+5:30
शाळा बंद असल्याने मुलांच्या अशा प्रतापांनी पालकांची चिंता मात्र वाढली आहे...
बारामती: कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासुन शाळा बंद आहेत. लहान मुले,विद्यार्थी अभ्यासापासुन मुक्त आहेत.याच काळात या मुलांना नको ते उद्योग सुचत आहेत.मात्र, या उद्योगांनी पालकांच्या जीवाला घोर लावला आहे. बारामती येथे अशाच एका बालकाने दोन रुपयांचे नाणे खेळता खेळता गिळल्याचा प्रकार घडला.पालकांसह तज्ञ डॉक्टरांनी तातडीने ते नाणे बाहेर काढल्याने अनर्थ टळला.पालकांनी याच काळात लहान मुलांकडे लक्ष देण्याची गरज बालरोग तज्ञांनी व्यक्त केली आहे.
शहरातील माजी उपनगराध्यक्ष संजय लालबिगे यांचा पुतण्या दक्ष (वय ४ वर्ष) याने मंगळवारी(दि २९) सायंकाळी मोबाईलवर खेळता खेळता दोन रुपयांचे नाणे गिळले.त्यामुळे त्याला श्वास घेण्यास काही प्रमाणात त्रास जाणवु लागला.तसेच मळमळ वाढल्याची तक्रार त्याने पालकांकडे केली.त्याच्या पालकांनी तातडीने डॉ. राजेंद्र मुथा यांच्या रुग्णालयात बालकाला दाखल केले.यावेळी तपासणी केल्यानंतर डॉ सौरभ मुथा यांनी एक्सरे काढत नाणे नेमके कुठे अडकले आहे,याची माहिती घेतली.त्यानंतर त्यांनी तातडीने भुलतज्ञ डॉ. अमर पवार, डॉ.वैभव मदने यांना या प्रकाराची माहिती दिली.त्यानंतर या डॉक्टरांनी मिळुन दुर्बिणीच्या सहाय्याने अन्ननलिकेत अडकलेले नाणे काढले.त्यानंतर दक्षचा त्रास कमी झाला.तसेच पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
याबाबत ‘लोकमत’शी बोलताना डॉ. सौरभ मुथा यांनी सांगितले कि, शाळा नसल्याने मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.त्यांच्या दिनक्रमाकडे पालकांचे लक्ष असलेच पाहिजे.
गेल्या दोन दिवसांत मुलांनी नाणे गिळल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.काही मुलांच्या नाकात शेंगदाणे,फुटाणे अडकल्याचे प्रकार घडतात.शिट्टी गिळण्याने त्रास झालेली बालके रुग्णालयात आलेली आहेत.काल दक्ष याचा श्वास कोंडत होता,त्याला उलटी होण्याचा त्रास होता.दुर्बिणीच्या सहाय्याने १५ ते २० मिनिटांत त्याच्या अन्ननलिकेत अडकलेले नाणे काढण्यास सुदैवाने यश आले.त्याला घरी सोडण्यात आले आहे.त्याची प्रकृती स्थिर आहे.