परिचारिकांच्या संपात चिमुरडीचा जीव धाेक्यात !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 12:55 PM2022-06-01T12:55:39+5:302022-06-01T13:05:58+5:30
"माझ्या पोरीचे रडणे कसे थांबवू...", स्वातीच्या वडीलांची केविलवाणी स्थिती...
-ज्ञानेश्वर भाेंडे
पुणे : ‘वीस दिवस झाले पाेरीने डाेक्याची पिन गिळलीय. ती तिच्या पाेटात अडकलीय. पाेरगी सारखी रडतीय; पण तिचे ऑपरेशन खासगीमध्ये करायला २५ ते ३० हजार रुपये खर्च येतोय. तेवढी आमची ऐपत नाही. म्हणून ससून हाॅस्पिटलमध्ये जाऊन आलाे; पण तिथेही पदरी निराशाच पडली. परिचारिकांच्या संपामुळे ॲडमिट करून घेतले नाही. आता, या चिमुकलीचे रडणे कसे थांबवू आणि काय करू ते समजेना...’’ अशी केविलवाणी अवस्था सहा वर्षांच्या स्वातीचे वडील बाळू नेटारे यांची झाली आहे.
ससूनसारखी शासकीय रुग्णालये हे सर्वसामान्यांसाठी आशास्थान आहेत. खाजगी रुग्णालयांमधील नफेखाेरी असलेले लाखाे रुपयांचे उपचार गरिबांना परवडत नाहीत, ते येथे येऊन उपचार करतात. मात्र, या रुग्णालयातील परिचारिका विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. त्यामुळे नव्या रुग्णांना दाखल केले जात नाही. त्याचा परिणाम मात्र स्वातीसारख्या चिमुरडीवर झाला आहे. तिच्या उपचारासाठी वडील बाळू व चुलते शिवाजी नेटारे सवलतीच्या दरांत उपचार हाेतील, अशा रुग्णालयांत गेल्या वीस दिवसांपासून दाराेदार फिरत आहेत; पण तिची दया मात्र काेणालाही येईना.
स्वातीने खेळताना १९ मे राेजी पिन गिळली व ती पाेटात अडकली. ती पिन शस्त्रक्रिया करून काढणे गरजेचे आहे. मात्र, सुरक्षारक्षकाची व महिन्याला ९ हजार रुपये पगार असलेल्या पाषाण येथे राहणारे तिचे वडील बाळू नेटारे यांना खासगीतला खर्च परवडत नाही.
चार हाॅस्पिटलचे उंबरे झिजवले; पण व्यर्थ...
स्वातीला सुरुवातीला नवले हाॅस्पिटल येथे दाखवले; पण तेथे या प्रकारच्या शस्त्रक्रियेची सुविधा नसल्याने त्यांनी सिम्बाॅयसिस गाठले. तेथेही ताेच अनुभव आला. पुढे ते ससूनला आले ससूनच्या डाॅक्टरांनी त्यांना रास्ता पेठेतील ताराचंद हाॅस्पिटलचा रस्ता दाखवला. तेथील डाॅक्टरांनी सीटीस्कॅन करायला सांगितले. ते केल्यावर त्या डाॅक्टरने त्यांच्या खाजगी हाॅस्पिटलला ऑपरेशन हाेईल; पण त्यासाठी २२ हजार रुपये व औषधे असा खर्च सांगितला.