तिसऱ्या लाटेतील धोका पाहता लहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:09 AM2021-05-23T04:09:07+5:302021-05-23T04:09:07+5:30
अजित पवार: विद्या प्रतिष्ठानमध्ये कोरोना आढावा बैठक बारामती: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून, सर्व विभागांनी प्रभाविपणे यंत्रणा राबवावी. ...
अजित पवार: विद्या प्रतिष्ठानमध्ये कोरोना आढावा बैठक
बारामती: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून, सर्व विभागांनी प्रभाविपणे यंत्रणा राबवावी. या लाटेमध्ये लहान बालके बाधित होण्याचा धोका संभावतो आहे, तरी त्यांच्यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्यायबाबत कार्यवाही करावी अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी शनिवारी घेतला. यावेळी ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. या वेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती नीता फरांदे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता विश्वास ओव्हाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, माजी जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, बारामती तालुक्यामध्ये कोरोनाची तिसरी संभाव्य लाट थोपविण्यासाठी सज्ज राहा. रुग्णालयात सर्व सुविधा असणे आवश्यक आहे, सर्व रुग्णालयांमध्ये फायर व ऑक्सिजन ऑडिट वेळेवर करून घ्यावे, सर्व रुग्णालयामध्ये जनरेटरची सुविधा असणे आवश्यक आहे. कोविड सेंटर तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. सध्या कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत आहे, ही बाब दिलासादायक आहे. तथापि, मृत्यू दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. कोणत्याही रुग्णांलयामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये वाढत आहे. या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. या रोगासाठीच्या औधषांच्या पुरवठ्यामध्ये गैरप्रकार न होता योग्य वापर व नियोजन करण्यात यावे. कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना म्युकरमायकोसिस अथवा अन्य काही लक्षणे दिसल्यास याची माहिती दूरध्वनीवरून घेण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुभार्वाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.
२२०५२०२१ बारामती—०५