मुलीच्या अंगावर केली लघुशंका, चौथीच्या विद्यार्थ्यांचे कृत्य, वाघोली जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 03:22 AM2017-09-12T03:22:14+5:302017-09-12T03:22:34+5:30
मधल्या सुट्टीमध्ये शौचालयासाठी गेलेल्या दुसरीतील मुलीला खाली पाडले. तसेच तिच्या अंगावर चौथीच्या मुलाने लघुशंका केली. हा गंभीर प्रकार वाघोली जिल्हा परिषद शाळेमध्ये शनिवारी सव्वानऊच्या सुमारास घडला.
वाघोली : मधल्या सुट्टीमध्ये शौचालयासाठी गेलेल्या दुसरीतील मुलीला खाली पाडले. तसेच तिच्या अंगावर चौथीच्या मुलाने लघुशंका केली. हा गंभीर प्रकार वाघोली जिल्हा परिषद शाळेमध्ये शनिवारी सव्वानऊच्या सुमारास घडला.
भेदरलेल्या मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी सोमवारी सकाळी शाळेमध्ये कळविले. लघुशंका करणारा मुलगा सापडला असून, मुलीचे हात पकडणा-या एकाचा व सर्व प्रकार पाहणाºया आणखी दोघांचा शोध शिक्षक घेत आहेत. घडलेल्या प्रकारामुळे मात्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे.
वाघोली जिल्हा परिषद शाळेमध्ये ७०० मुली व ७०० मुले शिक्षण घेत आहे. शनिवारी सकाळी ९ ची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर सर्व मुले बाहेर आली होती. सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास दुसरीमध्ये शिकणारी एक मुलगी शाळेच्या सीमाभिंतीलगत ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे असणा-या पडक्या घरासमोर शौचालयासाठी गेली होती. त्या वेळी चौथीत शिकणारा एक विद्यार्थी तिघांसोबत त्या ठिकाणी उपस्थित होता.
मुलगी शौचालयावरून परतत असताना एका मुलाने तिचा हात पकडून खाली पाडले, तर चौथीतील विद्यार्थ्याने तिच्यावर लघुशंका केली. इतर दोन मुले घडत असलेला प्रकार पाहत होती. मुलीने हात सोडवून वर्गाच्या दिशेने पळ काढला व इतर मुलींना घडलेला प्रकार सांगितला. घाबरल्याने कोणीही शिक्षकांना माहिती दिली नाही. अकरा वाजता शाळा सुटल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. शाळा बंद झाल्याने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगता आला नाही.
सोमवारी सकाळी मुलीचे पालक मुलीला शाळेत सोडण्यासाठी आल्यानंतर शिक्षकांना घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. मुलीने लघुशंका केलेल्या चौथीतील मुलाला ओळखल्याने मुख्याध्यापक, शिक्षक व जमलेल्या ग्रामस्थांनी इतर उपस्थित मुलांचीही विचारपूस केली असता मुलाने सोबत असलेल्या मुलांना चेहºयाने ओळखतो. परंतु नाव, घर सांगता येत नसल्याचे शिक्षकांना सांगितले. मुख्याध्यापक इतर तिघांचा शाळेच्या आवारामध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
असे प्रकार रोखण्यासाठी खबरदारी घ्या
आमच्या मुलीसोबत घडलेला प्रकार गंभीर असला तरी या वयामध्ये मुलांकडून अशा प्रकारची होणारी वर्तणूक गंभीर आहे. शिक्षक व पालकांनी मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे, असे या मुलीच्या पालकांनी अपेक्षा व्यक्त केली.
सीमाभिंत, सुरक्षारक्षकाची गरज
जिल्हा परिषद शाळेच्या भोवताली अनेक ठिकाणी सीमाभिंतीचे काम झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थी बाहेर जात असतात, तर बाहेरील मुले सहजपणे आतमध्ये येतात. शाळा सुटल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेचे कुलूप तोडणे, रात्री दारू पिणे, अश्लील चाळे करणे आदी प्रकार होत असतात. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेने सकाळी व रात्री सुरक्षा नेमून सीमाभिंतीचे काम करावे, अशीही मागणी होत आहे.
दोन पाळीमध्ये काम व्हावे
वाघोली जिल्हा परिषद शाळेमध्ये १४०० विद्यार्थी शिक्षण घेत असले तरी मुली आणि मुलांची शाळेची वेळ एकच आहे. मधली सुट्टी झाल्यानंतर सर्वच विद्यार्थी बाहेर आल्याने शाळेच्या आवारामध्ये मोठी गर्दी होऊन शौचालयावर अधिकचा ताण येतो. मुली आणि मुलांची शाळेची वेळ दोन पाळीमध्ये करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या या प्रस्तावावर जिल्हा परिषदेने लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी शिक्षक व ग्रामस्थांनी केली आहे.