राजगडावर दिसली ‘निमास्पिस’ प्रजातीमधील सर्वांत लहान पाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:11 AM2021-03-22T04:11:38+5:302021-03-22T04:11:38+5:30
पुणे : पश्चिम घाटातील महत्त्वाचा किल्ला असणाऱ्या राजगडावर पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. ‘निमास्पिस’ वर्गातील या पालीचे नामकरण ...
पुणे : पश्चिम घाटातील महत्त्वाचा किल्ला असणाऱ्या राजगडावर पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. ‘निमास्पिस’ वर्गातील या पालीचे नामकरण ‘निमास्पिस राजगडएन्सिस’ असे केले आहे. ही प्रदेशनिष्ठ पाल असून, तिचा जगात इतर कुठेही आढळ नसल्याचे पुण्यातील वन्यजीव संशोधक अनिस परदेशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ही प्रजाती ‘युनिक’ असून, तिचा अधिवास जपला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या पालीचा शोध वन्यजीव संशोधक अनिष परदेशी, अमित सय्यद, विवेक फिलिप सिरियॅक आणि शौरी सुलाखे या संशोधकांनी लावला आहे. या पालीचा शोध गतवर्षी २७ सप्टेंबर २०२० मध्ये लागला. त्यानंतर त्याविषयी जगभरात कुठे माहिती आहे का ? त्यावर संशोधन झाले. वर्षभर त्याविषयी संशोधन केल्यावर आता 'इव्होल्यूशनरी सिस्टीमॅटिक्स' संशोधनपत्रिकेत त्याची माहिती प्रसिद्ध झाली आहे. अनिस आणि त्याच्या टीमला राजगडाच्या पाली दरवाजाच्या दगडांमध्ये ही पाल दिसली. दगडांच्या कपारीत तिचा अधिवास आहे. ही पाल दिसल्यावर तिच्या आकारशास्त्र, गुणसूत्रांच्या अभ्यासानंतर ती प्रदेशनिष्ठ असल्याचे समोर आले. या पालीचा आकार २७ मिलीमीटर असून, हा या कुळातील सर्वांत कमी असल्याचे अनिस यांनी सांगितले. तसेच ही पाल केवळ राजगडाच्या पाली दरवाजाच्या परिसरामध्येच सापडते.
‘निमास्पिस’या कुळातील पालींना ‘ड्वार्फ गेको’ असे म्हटले जाते. या कुळातील पाली प्राचीन असून त्यांची उत्क्रांती साधारणपणे ५० दशलक्ष वर्षांपूर्वी पश्चिम घाटामध्ये झाल्याचे समजते. त्यांच्या बुबुळांच्या वैशिष्ट्यामुळे या कुळातील पाली इतर पालींपासून जरा वेगळ्या आहेत. भारतातील इतर पालीची बुबुळे उभी दिसतात. तसेच ही पाल प्रामुख्याने दिनचर आहे. इतर पाली निशाचर असतात. म्हणून यांना ‘डे गेको’ असेही म्हणतात.
—————————-
‘निमास्पिस’ कुळाच्या ५० प्रजाती
‘निमास्पिस’ कुळातील ५० प्रजातींची नोंद भारतात असून, त्यातील पाली पश्चिम घाट, पूर्व घाटातील काही भाग, आसाम, अंदमान, निकोबार बेटांवरही या कुळातील पाली दिसतात. पण ‘निमास्पिस राजगडएन्सिस’ ही फक्त राजगडावरच दिसते. यांचे खाद्य कीटक आहे.
———————————
राजगडावर दगडांचे जुने बांधकाम आहे. त्यातील पाली दरवाज्याच्या फटीत या पालीचा अधिवास आहे. तिची संख्याही कमी असून, तिचे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यामुळे किल्ल्याचा विकास करताना ही बाब लक्षात घ्यायला हवी. गडावर जैवविविधता असल्याचा हे एक उत्तम उदाहरण आहे.
- अनिष परदेशी, वन्यजीव संशोधक