राजगडावर दिसली ‘निमास्पिस’ प्रजातीमधील सर्वात लहान पाल; गडाच्या नावाने नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 03:21 AM2021-03-22T03:21:03+5:302021-03-22T03:21:22+5:30
पुण्याच्या वन्यजीव संशोधकाचा सहभाग, दगडांच्या कपारीत तिचा अधिवास आहे. ही पाल दिसल्यावर तिच्या आकारशास्त्र, गुणसूत्रांच्या अभ्यासानंतर ती प्रदेशनिष्ठ असल्याचे समोर आले.
पुणे : पश्चिम घाटातील महत्त्वाचा किल्ला असणाऱ्या राजगडावर पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. ‘निमास्पिस’ वर्गातील या पालीचे नामकरण ‘निमास्पिस राजगडएन्सिस’ असे केले आहे. ही प्रदेशनिष्ठ पाल असून, ती जगात इतर कुठेही आढळत नसल्याचे पुण्यातील वन्यजीव संशोधक अनिस परदेशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ही प्रजाती ‘युनिक’ असून, तिचा अधिवास जपला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या पालीचा शोध वन्यजीव संशोधक अनिस परदेशी, अमित सय्यद, विवेक फिलिप सिरियॅक आणि शौरी सुलाखे या संशोधकांनी लावला आहे. या पालीचा शोध मागील वर्षी २७ सप्टेंबर मध्ये लागला. त्यानंतर त्याविषयी जगभरात कुठे माहिती आहे का, त्यावर संशोधन झाले. वर्षभर त्याविषयी संशोधन केल्यावर आता ‘इव्होल्यूशनरी सिस्टीमॅटिक्स’ संशोधनपत्रिकेत त्याची माहिती प्रसिद्ध झाली आहे. अनिस आणि त्याच्या टीमला राजगडाच्या पाली दरवाजाच्या दगडांमध्ये ही पाल दिसली.
दगडांच्या कपारीत तिचा अधिवास आहे. ही पाल दिसल्यावर तिच्या आकारशास्त्र, गुणसूत्रांच्या अभ्यासानंतर ती प्रदेशनिष्ठ असल्याचे समोर आले. या पालीचा आकार २७ मिलीमीटर असून, हा या कुळातील सर्वात कमी असल्याचे अनिस यांनी सांगितले. ‘निमास्पिस’या कुळातील पालींना ‘ड्वार्फ गेको’ असे म्हटले जाते.
‘निमास्पिस’ कुळाच्या ५० प्रजाती
‘निमास्पिस’ कुळातील ५० प्रजातींची नोंद भारतात असून, त्यातील पाली पश्चिम घाट, पूर्व घाटातील काही भाग, आसाम, अंदमान, निकोबार बेटांवरही या कुळातील पाली दिसतात. पण ‘निमास्पिस राजगडएन्सिस’ ही फक्त राजगडावरच दिसते. यांचे खाद्य कीटक आहे.