स्मार्ट सुशोभीकरणाला अवकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:16 AM2017-08-03T03:16:58+5:302017-08-03T03:16:58+5:30
स्मार्ट सिटीच्या पाऊलखुणा म्हणून जंगली महाराज रस्त्यावरील सुशोभीकरण योजनेची गाजावाजा करून सुरुवात झाली खरी. मात्र सायंकाळच्या वेळी या ठिकाणाचा पाणीपुरी व तत्सम विक्रेते
पुणे : स्मार्ट सिटीच्या पाऊलखुणा म्हणून जंगली महाराज रस्त्यावरील सुशोभीकरण योजनेची गाजावाजा करून सुरुवात झाली खरी. मात्र सायंकाळच्या वेळी या ठिकाणाचा पाणीपुरी व तत्सम विक्रेते आणि पथारीवाल्यांनाही आसरा वाटू लागला आहे. इतस्तत: पडलेला कचरा, पार्क केलेली दुचाकी वाहने असे दृश्य या सुशोभीकरणात सध्या दिसत असून मेट्रो रेल्वेचे स्थानकाचा सांगावा देणारा फलक झळकू लागल्याने सुशोभीकरणाची लवकरच अवकळा होण्याची चिन्हे आहेत.
सुशोभीकरणासाठी जंगली महाराज रस्त्याचा दुतर्फा भाग व्यापल्याने महानगरपालिकेने या रस्त्याचा ‘बोळ’ झाल्याची टीका मध्यंतरी झाली होती. सकाळी फिरण्याचा व्यायाम करण्यासाठी येणाºया स्थानिक नागरिकांसाठी सुशोभीकरणाचा परिसर रम्य असल्याचे बोलले जाते. तथापि, खाद्यपदार्थ, पुस्तके आणि तत्सम वस्तू विकणाºयांची मोठी लगबग या रस्त्यावर असते.
सायंकाळ होऊ लागताच पाणीपुरी विक्रेते, फुगे विक्रेते, शेंगदाणे, फुटाणे तसेच चहा विक्रेते यांनी या भागात ठिय्या मारणे सुरू केले आहे. विक्रेत्यांकडून घेतलेल्या पदार्थांच्या उष्ट्या डीश,
प्लॅस्टिकच्या पिशव्या, पालापाचोळा यांचा कचरा सुशोभीत
केलेल्या भागामध्ये इतस्तत: पडलेला दिसून येतो.
मेट्रो रेल्वेचे स्थानक संभाजी उद्यानाच्या परिसरातच असणार असून त्याची माहिती देणारा फलक पालिकेने नुकताच संभाजी उद्यानालगत, सुशोभीत पदपथाजवळच्या सायकल ट्रॅकजवळ लावला आहे. या स्थानकाच्या कामासाठी सुशोभीत पदपथ उखडावा लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. पालिकेने या पदपथाच्या स्वच्छतेकडे, विक्रेत्यांच्या व वाहनांच्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केल्याने मूळ हेतू बाजुला पडला असून आगामी काळात सुशोभीकरणाच्या सुस्थितीबद्दल शंका उपस्थित
होत आहेत.