महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या वतीने दिव्यांगांना स्मार्ट कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:09 AM2021-06-04T04:09:48+5:302021-06-04T04:09:48+5:30

सासवड : राज्यातील दिव्यांगांना समाजकल्याण विभाग, एसटी महामंडळ, केंद्राचे वैश्विक युडीआयडी कार्ड आदी विविध प्रकारचे पासेस शासनामार्फत देण्यात आहेत. ...

Smart card for the disabled on behalf of Maharashtra State ST Corporation | महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या वतीने दिव्यांगांना स्मार्ट कार्ड

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या वतीने दिव्यांगांना स्मार्ट कार्ड

googlenewsNext

सासवड :

राज्यातील दिव्यांगांना समाजकल्याण विभाग, एसटी महामंडळ, केंद्राचे वैश्विक युडीआयडी कार्ड आदी विविध प्रकारचे पासेस शासनामार्फत देण्यात आहेत. हे मिळविताना त्यांना प्रत्येक कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. परंतु आता केंद्र शासनाने हे सर्व पास बंद करून एकच स्मार्ट कार्ड देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे एकाच प्रकारचे कार्ड सर्व ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे. त्याची अंमलबजावणी एसटी महामंडळाच्या वतीने करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्यात या उपक्रमाची सुरुवात पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सासवड येथील एसटी आगारात करण्यात आली. पुरंदर मधील ७५ दिव्यांगांना या वेळी स्मार्ट कार्ड वितरण करण्यात आले.

केंद्र सरकारच्या २०१६ च्या कायद्यानुसार वैश्विक ओळखपत्रावर एसटी प्रवासाचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाने ६ मार्च २०२१ रोजी सर्व ३६ जिल्ह्यांना विविध २१ प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना स्मार्ट कार्डची नोंदणी कारणाबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी करण्यास एसटी महामंडळाने सुरुवात केली असून यासाठी दिव्यांगाना युडीआयडी कार्ड, आधार कार्ड व मोबाईल नंबर आवश्यक असल्याचे सासवड आगाराच्या आगार प्रमुख मनीषा इनामके यांनी सांगितले आहे.

या वेळी प्रहार अपंग संघटनेच्या महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे, संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे सदस्य संभाजी महामुनी, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश कडू, सचिव गणेश भुजबळ, वाहतूक नियंत्रक कैलास जगताप, महेश भोंगळे, गणेश कामथे, तसेच तालुक्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.

या अंतर्गत दिव्यांगांना ७५ टक्के सवलत देण्यात आली असून ६० ते १०० टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीच्या सोबतीस ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. यासोबत कार्यप्रणाली एसओपी ( स्तन्दार्द ऑपरेटिंग प्रोसिजर ) सोबत जोडण्यात आली आहे. दरम्यान एसटी महामंडळाच्या वतीने राज्यातील दिव्यांग व्यक्तींना ३१ मार्च २०२१ च्या परिपत्रकानुसार स्मार्ट कार्ड मिळण्यासाठी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदत दिली असून १ ऑक्टोंबर २०२१ पासून हे स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.

--

चौकट

शासनाने दिव्यांगांना एकाच प्रकारचे स्मार्ट कार्ड देऊन त्यांची होणारी फरफट थांबवली आहे. यामुळे दिव्यांगांना फारसा त्रास होणार नाही. कोरोनाचे सावट कमी होताच पुरंदरमध्ये ऑनलाईन प्रमाणपत्र वितरणाचा कॅम्प लावण्यात येईल, तरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी त्वरित करून घ्यावी. असे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले आहे. सध्या कोरोनाचे सावट असल्याने दिव्यांग बांधवांना घराबाहेर पडणे अवघड आहे. अद्याप ऑनलाईन प्रणाली बंद असून राज्यातील हजारो दिव्यांगांना प्रमाणपत्र, युडीआयडी कार्ड मिळाले नाही. प्रमाणपत्र आवश्यक असल्याने एसटी महामंडळाने हा उपक्रम पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी आणखी काही महिने मुदतवाढ द्यावी. अशी मागणी प्रहार अपंग संघटनेच्या महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी केली आहे.

----

फोटो क्रमांक : ०३सासवड एसटी पुरंदर

फोटो ओळ : दिव्यांगांना स्मार्ट कार्ड वाटप करताना आगार प्रमुख मनीषा इनामके, सुरेखा ढवळे, संभाजी महामुनी.

Web Title: Smart card for the disabled on behalf of Maharashtra State ST Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.