स्मार्ट सिटीतील स्मार्ट सिग्नल्सचा निर्णय आज
By admin | Published: June 17, 2017 03:38 AM2017-06-17T03:38:32+5:302017-06-17T03:38:32+5:30
स्मार्ट सिटी योजनेतंर्गत एकाच विशिष्ट कंपनीला प्राधान्य देण्यावरून वादग्रस्त झालेल्या अॅडाप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टिम (एटीएमएस)
पुणे : स्मार्ट सिटी योजनेतंर्गत एकाच विशिष्ट कंपनीला प्राधान्य देण्यावरून वादग्रस्त झालेल्या अॅडाप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टिम (एटीएमएस) या अत्याधुनिक सिग्नल्सबाबत पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या शनिवारी (दि. १७) होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. कंपनीचे अध्यक्ष व नगर विकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांच्या उपस्थितीत बाणेर येथे एका हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे.
पुण्यासह पिंपरी-चिंचवड येथेही असे सिग्नल्स बसवण्यात येणार आहेत. चौकातील वाहनांची संख्या लक्षात घेऊन वेळेचे नियोजन करणारे हे सिग्नल्स आहेत. काही कोटी रुपयांच्या या कामासाठी एल अॅँँड टी, शापूरजी पालनजी व टाटा सिस्टिम यांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यातील टाटा सिस्टिम यांची निविदा छाननीत अपात्र ठरली. त्यामुळे ती पुढे खुलीच करण्यात आली नाही. एल अॅण्ड टी ची निविदा ३२६ कोटी रुपयांची व शापूरजी पालनजी यांची ४४७ कोटी रुपयांची आहे.
टाटा सिस्टिम यांनी त्यांची निविदा अपात्र केल्यामुळे नगर विकास खात्याकडे तक्रार केली होती. त्यावरून कंपनीचे अध्यक्ष डॉ. करीर यांनी शंका घेणारे एक पत्रच पाठवले होते. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळेच आता शनिवारी या विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे. पुण्यातील सी-डॅक यांनी हेच काम १५० कोटी रुपयांत करून देण्याची तयारी दर्शवली असल्याचीही चर्चा महापालिका वर्तुळात आहे. स्मार्ट सिटी तसेच महापालिकेचीची कामे एकाच कंपनीला दिली जात असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून केला जात आहे.