‘स्मार्ट सिटी’ला वादळानंतर मंजुरी
By admin | Published: December 15, 2015 04:16 AM2015-12-15T04:16:49+5:302015-12-15T04:16:49+5:30
शहराच्या स्मार्ट सिटी आराखड्याला अखेरच्या क्षणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेने पाठिंबा जाहीर केल्याने मुख्य सभेमध्ये १३ तासांच्या वादळी चर्चेनंतर त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली.
पुणे : शहराच्या स्मार्ट सिटी आराखड्याला अखेरच्या क्षणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेने पाठिंबा जाहीर केल्याने मुख्य सभेमध्ये १३ तासांच्या वादळी चर्चेनंतर त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. त्याच वेळी स्पेशल पर्पज व्हेईकलमुळे (एसपीव्ही) महापालिकेची स्वायत्तता धोक्यात येऊ नये याकरिता त्याचे अधिकार कमी करणाऱ्या ५ उपसूचनांना मुख्य सभेने मंजुरी दिली.
राज्यशासानाने दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी स्मार्ट आराखड्याचे भवितव्य ठरविण्यासाठी मुख्य सभा झाली. महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी सभा होत असल्याने स्मार्ट आराखड्यावर काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. नगरसेवकांचा तीव्र विरोध असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी स्मार्ट सिटी आराखड्याला पाठिंबा देण्याच्या सूचना दिल्याने आराखडा मंजुरीचा मार्ग सुकर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट व आयुक्त कुणाल कुमार यांनी आराखडा मंजुरीसाठी लावलेली फिल्डिंग अखेर यशस्वी ठरली.
एसपीव्हीच्या तरतुदींना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसेच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शविला होता. स्मार्ट सिटी आराखड्यावरून शहरामध्ये गेल्या ५ ते ६ दिवसांपासून रणकदंन सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे यांच्याकडून या आराखड्याला तीव्र विरोध केला जात असल्याने याला मंजुरी मिळणार की नाही, याबाबत साशंकता होती. मुख्य सभेचे कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसने आराखडयातील काही तरतुदींना विरोध कायम ठेऊन त्याला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. दुपारच्या भोजनानंतर सभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर बाबू वागस्कर यांनी स्मार्ट सिटीला पाठिंबा देत असल्याचे घोषित करताच सभागृहातील वातावरण बदलले. अन् सर्व अनिश्चिता संपून स्मार्ट सिटी आराखडा दोन तृतीयांश बहुमताने मंजूर होणार हे स्पष्ट झाले.
स्मार्ट सिटी आराखड्यातील एसपीव्हीच्या वादग्रस्त तरतुदी, औंध-बाणेर या विकसित भागाचाच पुन्हा विकास, आयुक्तांनी विश्वासात न घेणे या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसेच्या सभासदांकडून याला तीव्र विरोध करण्यात येत होता. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी याबाबत बैठक घेऊन नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्या होत्या. मुख्यसभा सुरू होईपर्यंत स्मार्ट सिटी राजकीय पक्षांकडून स्मार्ट सिटी आराखडयाबाबत शह-काटशहाचे राजकारण सुरू होते.