स्मार्ट सिटीचे आरोग्य ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:55 AM2018-07-25T01:55:58+5:302018-07-25T01:56:18+5:30
बाणेर-बालेवाडीत नागरिकांचे हाल : एकही नाही आरोग्य केंद्र, प्रशासनाची उदासीनता
- प्रकाश कोकरे
पुणे : पुणे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बाणेर-बालेवाडी हा भाग निवडण्यात आला आहे. या स्मार्ट सिटीच्या नियोजनानुसार रस्ते, कचरा, शिक्षण, आरोग्य, अशा अनेक सुविधा पुरवण्यात येणार आहेत; परंतु सद्य:स्थितीत या सुविधांमधील आरोग्यावर अजिबात लक्ष दिले जात नाही. यासाठी पालिकेकडून प्राथमिक आरोग्य केंद्रे दिली जातात असे एकही केंद्र बाणेर-बालेवाडी भागात नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले आहे.
बाणेर - बालेवाडी गावाचा पुणे महानगरपालिकेमध्ये समावेश होऊन जवळपास २१ वर्षे झाली आहेत; परंतु गेल्या २१ वर्षा$ंत या भागात साध्या प्राथमिक आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात पालिका अयशस्वी ठरली आहे. कारण, या भागात कोणतेही मोठे सरकारी रुग्णालय नाही. इतकेच काय साधे प्राथमिक आरोग्य केंद्रसुद्धा नाही. बाणेर-बालेवाडीचा भाग स्मार्ट सिटीमध्ये सहभागी झाल्यानंतर, आरोग्याच्या सुविधांचा अभाव हा प्रकर्षाने जाणतो. त्यामुळे स्मार्ट सिटीची संकल्पना किती पोकळ आहे, हेच यातून अधोरेखित होते. असा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सध्या स्मार्ट सिटीमध्ये बाणेर- बालेवाडी या भागाचा समावेश होतो. पुणे शहराची लोकसंख्या २०११ नुसार ३१,२४,४५८ इतकी सांगितली जाते. स्मार्ट सिटी घोषित केलेल्या या भागात पुण्याची दीड लाख लोकसंख्या वास्तव्य करते. आकडेवारीनुसार दर ४०,००० लोकसंख्येमागे किमान एक आरोग्यकेंद्र व रुग्णालय असावे, असा निकष आहे. त्यामुळे या भागात आरोग्य केंद्र व रुग्णालयाची आवश्यकता असताना, या भागात एकही मोठे रुग्णालय नाही किंवा आरोग्यकेंद्र नाही. सद्य:परिस्थिती अत्यंत केविलवाणी अशी आहे.
गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्यामुळे नागरिकांना शहरातील ससून रुग्णालयात, सांगवीतील रुग्णालयात दाखल व्हावे लागते. तातडीच्या वेळी नागरिकांची दमछाक होते. आजार गंभीर असेल किंवा रुग्णाची स्थिती गंभीर असेल, तर त्यांना जीवही गमवावे
लागतात.
किंवा त्यांना तेथील खासगी रुग्णालयात दाखल व्हावे लागते. नागरिकांसमोर सरकारी रुग्णालायचा पर्याय नसल्यामुळे ऐपत नसतानाही जीव वाचवायचा म्हणून नागरिक पैशाचा विचार करत नाहीत. त्या वेळी उपचाराच्या बदल्यात नागरिकांची पैशाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात लूट केली जाते.
प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली, तर नागरिकांना या सुविधा अगदी माफक दरात मिळतील आणि त्यामुळे नागरिकांना उपचार घेण्यासाठी दुसरीकडे जाण्याची गरज भासणार नाही. कमी खर्चात खात्रीशीर उपाय करून आजारांवर मात करता येईल. या सुविधा सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या असतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या सुविधेचा लाभ घेतात. त्यामुळे नागरिकांकडून प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी करण्यात येत आहे.
विश्व क्लिनिकच्या मागे या भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अर्धवट बांधून तयार आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या ठिकाणी आरोग्य केंद्र कार्यान्वित होत नाही. या परिस्थिचीचा फायदा घेत खासगी हॉस्पिटची चलती आहे. सांगवीच्या हॉस्पिटलला जावे लागते. पोलिओ डोस किंवा अपघात झाल्यावर लांबच्या रुग्णालयात जावे लागते. या रुग्णालयावरदेखील ताण येतो. या परिस्थितीचा लाभ खासगी हॉस्पिटलचा धंदा करणाºयांनी घेतला आहे. त्यामुळे या भागात मोठ मोठ्या खासगी हॉस्पिटलच्या चेन सुरू झाल्या आहेत. पश्चिम पट्ट्यात एकही हॉस्पिटल नाही.
- रवींद्र पतंगे,
नागरिक, बालेवाडी
प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम चालू होणार आहे. या संदर्भात तयार बांधकाम संरचनेचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे याची तयारी झाली आहे. केवळ संबंधित जागेवर सामान आणून जोडून घेण्याचे काम बाकी आहे.
- संदीप कदम, सह.आयुक्त,
औंध क्षेत्रीय कार्यालय