स्मार्ट सिटी समावेश; शहरात संभ्रमावस्था
By admin | Published: June 20, 2016 12:55 AM2016-06-20T00:55:31+5:302016-06-20T00:55:31+5:30
पिंपरी-चिंचवडसह आठ शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश झाला, अशी बातमी शनिवारी रात्री सोशल मीडियावरून फिरत होती
पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह आठ शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश झाला, अशी बातमी शनिवारी रात्री सोशल मीडियावरून फिरत होती. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. स्मार्ट सिटी समावेशाचा संभ्रम कायम आहे.
केंद्र सरकारच्या वतीने देशातील १०० शहरांचा समावेश स्मार्ट सिटीत करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार शहरामध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात पिंपरी-चिंचवड शहराला ९२.५ गुण मिळाले होते. त्यानंतर अंतिम यादीत गुणवत्ता असताना केवळ राजकारण झाल्याने अंतिम यादीतून पिंपरी-चिंचवडला वगळण्यात आले. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, त्यामुळे भाजपाने शहर वगळल्याची टीकाही केली होती. त्यानंतर दुसरी यादीही प्रसिद्ध झाली, त्यातही पिंपरी-चिंचवडचा समावेश केलेला नाही. पहिली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या यादीत शहराचा समावेश करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा दावा भारतीय जनता पक्षाने केला होता. यावरून पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, मनसेच्या नेत्यांनी भाजपाला लक्ष्य केले होते. राजकारण झाल्याची टीकाही झाली होती. दरम्यानच्या कालखंडात राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांची भेट घेऊन निवेदन दिले.(प्रतिनिधी)