स्मार्ट सिटीबाबत आमदार गप्प
By admin | Published: December 19, 2015 03:09 AM2015-12-19T03:09:18+5:302015-12-19T03:09:18+5:30
‘‘स्मार्ट सिटीवर विधानसभेत जेव्हा चर्चा झाली, त्या वेळी मी पिंपरी-चिंचवडचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी केली. मी भूमिका मांडली, त्या वेळी पिंपरी-चिंचवडमधील एकही
पिंपरी : ‘‘स्मार्ट सिटीवर विधानसभेत जेव्हा चर्चा झाली, त्या वेळी मी पिंपरी-चिंचवडचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी केली. मी भूमिका मांडली, त्या वेळी पिंपरी-चिंचवडमधील एकही आमदार बोलला नाही, ही दुर्दैवाची बाब आहे,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी काळभोरनगर येथे व्यक्त केली. त्यावर पवार मोठे नेते आहेत. सर्वांना बोलायला
संधी मिळाली नाही, परंतु, स्मार्ट सिटीसाठी आम्ही थेट मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला, असा प्रतिटोला सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मारला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक आणि शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक चिंचवड काळभोरनगर येथे झाली. माजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत काळभोरनगर प्रभागाची निवडणूक बिनविराध करणे, स्मार्ट सिटी समावेश, नेते शरद पवार यांना पंचाहत्तरीनिमित्त अमृतकलश देणे या विषयांवर चर्चा झाली. चित्रपटाच्या अंगाने चित्रपट पाहायचा असतो, असे म्हणून ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाचे समर्थनही पवार यांनी केली. नवी मुंबई स्मार्ट सिटीतून वगळल्यास पिंपरी-चिंचवडचा विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
स्मार्ट सिटीत पिंपरी-चिंचवडचा समावेश न केल्याने विविध राजकीय पक्षांनी केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला होता. याविषयी विधानसभेत झालेल्या चर्चेत स्थानिक आमदार सहभागी न झाल्याविषयी पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर चिंचवड, भोसरी, पिंपरीतील आमदारांनी आपली मते व्यक्त केली.
स्मार्ट सिटीच्या मुद्द्यावर पवार म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटीतून नवी मुंबई बाहेर पडल्यास पिंपरी-चिंचवडचा प्राधान्याने विचार करावा. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.’’
बाजीराव मस्तानीचे समर्थन
पुण्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बाजीराव मस्तानी चित्रपटाचे खेळ बंद पाडले. त्यावर पवार म्हणाले, ‘‘एका हिंदी दिग्दर्शकाने आपल्या इतिहासावर चित्रपट काढला. चित्रपट हा चित्रपट म्हणून पाहायचा असतो. गोंधळ घालणे योग्य नाही.’’
वाघेरे म्हणाले, ‘‘शहराच्या वतीने पवार यांना तुकोबारायांची पगडी आणि चांदीचा अमृतकलश देणार आहोत. काळभोरनगर प्रभाग निवडणुकीविषयीही चर्चा झाली. काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी उमेदवार देण्यात येणार नाही. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष अन्य पक्षांची चर्चा करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना अजित पवार यांनी केली आहे.’’
आढावा बैठकीस पवार यांच्यासह महापौर शकुंतला धराडे, उमहापौर प्रभाकर वाघेरे, पक्षनेत्या मंगला कदम, स्थायीचे सभापती अतुल शितोळे, अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, जगदीश शेट्टी, योगेश बहल, मोहिनी लांडे, शिक्षण मंडळाचे सभापती चेतन घुले, उपसभापती नाना शिवले, आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
संबंधित चर्चेच्या मी उपस्थित नव्हतो. असतो तर बोललो असतो. नवी मुंबईने स्मार्ट सिटीतून बाहेर पडल्याचा निर्णय घेतल्यानंतर मी सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश करावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्रीही याबाबत सकारात्मक आहेत. - लक्ष्मण जगताप
स्मार्ट सिटीवरील चर्चा सुरू असताना बोलण्यास संधी मिळावी, म्हणून सर्वांना हात वर केले. मात्र, या प्रश्नावर निवडक लोकांनाच बोलण्याची संधी दिली. येथे जरी बोलण्याची संधी मिळाली, तरी मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र दिले आहे.
- महेश लांडगे
स्मार्ट सिटीवरील चर्चेच्या वेळी मी सभागृहात हजर होतो. त्या ठिकाणी मत मांडण्याचा माझा विचार होता. मात्र, सभागृहात पक्ष आणि ज्येष्ठ नेत्यांना पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली जाते. सर्वांनाच बोलण्याची संधी मिळत नाही. पवार हे मोठे नेते आहेत. त्यांना संधी दिली आम्हाला संधी मिळाली नाही.- गौतम चाबुकस्वार