स्मार्ट सिटी ‘एसपीव्ही’ला मंजुरी
By admin | Published: February 26, 2016 04:26 AM2016-02-26T04:26:24+5:302016-02-26T04:26:24+5:30
स्मार्ट सिटीमधील कामांसाठी स्थापन करायच्या एसपीव्हीला (स्वतंत्र कंपनी) महापालिकेत आज बहुमताने मंजुरी मिळाली. तत्पूर्वी, कंपनीचे विरोधक असलेल्या काँग्रेस, मनसेने त्यातील तरतुदींचे
पुणे : स्मार्ट सिटीमधील कामांसाठी स्थापन करायच्या एसपीव्हीला (स्वतंत्र कंपनी) महापालिकेत आज बहुमताने मंजुरी मिळाली. तत्पूर्वी, कंपनीचे विरोधक असलेल्या काँग्रेस, मनसेने त्यातील तरतुदींचे वाभाडे काढले. केंद्र व राज्य सरकारचा स्थानिक स्वराज्य संस्थांचे कंपनीकरण करण्याचा हा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला; तर मनसेने हा पुणे शहर गहाण टाकण्याचा प्रकार असल्याची टीका केली.
कंपनीला पाठिंबा असलेल्या पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी व सत्तेत नसूनही त्यांना पाठिंबा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या एकाही सदस्याने पाठिंब्याचे भाषण केले नाही. शिवसेनेने यापूर्वी कंपनीला विरोध केला होता; मात्र आज झालेल्या खास सभेत पाठिंबा दिला. काँग्रेस व मनसेच्या सदस्यांची उपसूचना फेटाळली गेली तर सेना, भाजप, राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या उपसूचना प्रस्तावाचा भाग करण्यात आल्या. कंपनी स्थापनेच्या बाजूने राष्ट्रवादी-भाजप-सेनेचे ८५ मतदान झाले. काँग्रेस व मनसेची ४८ मते विरोधात पडली. बहुमताने प्रस्ताव मंजूर झाला; मात्र त्यासाठी राष्ट्रवादी व भाजप तसेच आयुक्त कुणाल कुमार यांनाही टीकेचे घाव सोसावे लागले.
हा प्रस्ताव मंजूर व्हावा, यासाठी आयुक्त आग्रही होते. विरोध सौम्य व्हावा, यासाठी त्यांनी राजकीय नेत्यांच्या भेटी घेण्यासही कमी केले नाही.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीत सर्व काही प्रशासनाच्या बाजूने असल्याची टीका होत होती. मात्र, केंद्र सरकारची योजना आहे म्हणून सुरुवातीला भाजपचा, नंतर राष्ट्रवादीचा पाठिंबा त्यांना मिळाला व आता सेनाही कंपनी स्थापन करण्याच्या बाजूने होऊन प्रस्ताव मंजूर झाला. १५ मार्चच्या आत प्रस्ताव मजूर झाल्यामुळे प्रशासनाला आता कंपनी कायद्याखाली या कंपनीची नोंद करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.